राष्ट्रवादीच्या नाहाटाकडून योजनेच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा ! गुन्हा दाखल होताच फरार

fir aganist NCP Leader Balasheb Nahata: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) पदाधिकारी व राज्य बाजार समिती सहकारी संघाचा सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा ( Balasheb Nahata) याने सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी नाहाटासह तिघांविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
‘…त्यांना थोडीशी लाज’, बावनकुळेंचं कॉंग्रेस फोडा विधान, संजय राऊतांचा संताप
या प्रकरणी राहुल रामराजे मक्तेदार (वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाहाटा, अजय श्यामकांत चौधरी, अॅड. रविराज गजानन जोशी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौधरी व जोशी यांना दोघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी मिळून आयटी इंजिनिअर असलेले मक्तेदार यांची 2 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केलीय. आतापर्यंत 11 जणांची फसवणूक केली असून, फसवणुकीची रक्कम साडेनऊ कोटी इतकी आहे.
राहुल मक्तेदार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या पत्नीची सॉफ्टेज मॉड्युलर फर्निचर नावाची कंपनी आहे. अजय चौधरी याची गजानिया शेल्टर्स प्रा. लिमिटेडची फर्म आहे. त्यांची भांडारकर रोडवरील फ्लॅट, कार्यालय आणि टेरेसच्या फर्निचर आणि खिडक्यांच्या कामादरम्यान ओळख झाली. त्यावेळी चौधरी यांनी प्रवीणकुमार नाहाटा यांची भेट घडवून आणली.
कसा घातला गंडा?
राज्य सरकारच्या मॅग्नेट योजनेअंतर्गत एक कृषी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल आणि तुम्हाला तिचे संचालक बनवले जाईल, असे नाहाटा यांच्याकडून मक्तेदार यांना सांगण्यात आले. या योजनेत 20 लाख रुपये गुंतवल्यास 78 दिवसांनंतर सरकारी योजनेनुसार 60 लाख रुपये परतावा मिळेल, असे यापैकी 25 लाख रुपये ते स्वतःसाठी, पाच लाख रुपये अजय चौधरी यांना मध्यस्थीचे कमिशन आणि 20 लाख रुपये तुम्हाला परतावा म्हणून मिळतील, असे नाहाटा यांनी आश्वासन दिले. परतावा मिळाल्यानंतर तुमचा राजीनामा घेतला जाईल, असेही सांगितले. परंतु मक्तेदार यांनी यासाठी नकार दिला. परंतु नाहाटा यांनी ही सरकारी योजना असल्याने सांगून, त्यांना गुंतवणूक करण्यात भाग पाडले. मक्तेदार यांनी दागिने विकून या योजनेत पैसे गुंतवले. मक्तेदार यांच्याकडून 2 कोटी 20 लाख रुपये घेतले. परंतु पैसे परत न मिळाल्याने मक्तेदार यांनी तक्रार दिली.
बाळासाहेब नाहाटाला अनेक पदे
बाळासाहेब नाहाटा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आहे. ग्रामपंचायत, बाजार समितीमार्फत तो राजकारणात आहे. अजित पवार यांनी त्याला अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष केले होते. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो राज्य बाजार समिती सहकारी संघाचा सभापती झाला. नाहाटाविरुद्ध पूर्वीही गुन्हे दाखल आहेत.