पुण्यात आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे संकट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातही पाणीकपात लागू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
20 percent water cut comes into effect in Pune from today : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचे नियोजन आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातही पाणीकपात लागू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे पीक नुकसान, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि आगामी उन्हाळ्यातील पाणी नियोजन यावरही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पाणीसाठ्याचा उपलब्ध साठा, बाष्पीभवन आणि धरणांमधील मृतसाठा लक्षात घेऊन पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा अन्य कामांसाठी होणारा वापर रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. आवश्यकतेनुसार महावितरणच्या मदतीने संबंधित ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
व्हाट्सअँपवर ‘नो’ असा रिप्लाय देण्याआधी सावधान! सायबर फसवणुकीचा नवा प्रकार चर्चेत
दरम्यान, आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात पाण्याची गरज वाढल्यास जलतरण तलाव, वॉटर पार्क आणि वॉटर बॉटलिंग प्लांटच्या वापरावर निर्बंध घालण्याचा किंवा ते बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबरच रब्बी हंगाम, भाजीपाला पिके आणि बारमाही पिकांसाठी पाणी नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी महसूल, पोलीस, जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाच्या समन्वयातून पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. चारा उत्पादन वाढवणे आणि जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाला नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
हवामानातील संभाव्य बदल आणि अल निनोच्या परिणामांचा विचार करून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. आगामी मान्सूनच्या कालावधीबाबत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.
‘ज्ञानेश कुमार मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत’; अभिजीत दिपकेचे गंभीर आरोप!
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांना पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत, त्यांच्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यकतेनुसार पुन्हा पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारकडे अहवाल पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 20 टक्के पाणीकपात लागू झाली आहे, तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती, शेतीसाठी पाणी, जनावरांसाठी चारा आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.