मोशीतील शासकीय वसतिगृहात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, दूषित पाणी पिल्याने 20 विद्यार्थ्यांना विषबाधा
शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील पाणी पिल्यानंतर अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास होऊ लागला.
20 students poisoned after drinking contaminated water : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दूषित पाणी पिल्यामुळे 20 हुन अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील पाणी पिल्यानंतर अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास होऊ लागला.
काही विद्यार्थ्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे लक्षात येताच वसतिगृह प्रशासनाने तातडीने त्यांना उपचारासाठी भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर डॉक्टरांकडून तातडीने उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र सुमारे 8 ते 10 विद्यार्थ्यांवर अजून देखील उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नसल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील गंभीर दुर्लक्ष उघड केले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहातील पाण्याचा वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असताना देखील पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. फिल्टर दुरुस्त करण्याबाबत वारंवार तक्रारी करून देखील अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरून येणारे पाणी पिण्याची वेळ आली.
धाराशिवमध्ये शिवसेनेला उपाध्यक्षपद पण तानाजी सावंतांना राणाजगजितसिंह पाटील भारी पडले ?
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी वसतिगृहातील परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या व्हिडिओमध्ये स्वच पाण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही आणि अखेर ही गंभीर घटना घडली. दरम्यान, इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया न आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आदिवासी प्रकल्प अधीकारी प्रदीप देसाई यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी प्रशासनावर तीव्र टीका करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमच्या मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. वसतिगृहात स्वच्छ पाणी आणि मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालकांनीं केली आहे.
या घटनेमुळे शासकीय वसतिगृहांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये पिण्याचे स्वच पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध आहेत का, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
