आषाढी वारीपूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी मानाच्या अश्वांची भक्तिमय वंदना

"माऊली माऊली", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या अखंड जयघोषात रंगलेल्या या मंगल सोहळ्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

  • Written By: Published:
shrimant bhausaheb rangari ganpati

पुणे : आषाढी वारीला पंढरपूरला प्रस्थान करण्यापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात येऊन श्री गणरायाच्या चरणी भक्तिभावाने मानवंदना अर्पण केली. “माऊली माऊली”, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या अखंड जयघोषात रंगलेल्या या मंगल सोहळ्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या अनोख्या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते.

देशातील पहिला सार्वजनिक गणेश मंडळ असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे मानाच्या अश्वांचे विधिवत पूजन करण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार) यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व पुण्यात दाखल झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजीव जावळे, विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार) म्हणाले, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांना लाभलेले स्थान हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सेवाभावाची बाब आहे. दरवर्षी आषाढी वारीपूर्वी श्री गणरायाचे दर्शन घेऊनच हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी वंदन करून वारीची सुरुवात करण्याची ही अनोखी परंपरा आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. यापुढेही कायम माऊलींची कृपा आणि गणरायाचा आशीर्वाद असाच लाभत राहावा, हीच प्रार्थना.”

याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजीव जावळे म्हणाले, “आषाढी वारी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी वारकऱ्यांच्या सेवेत योगदान देण्याची संधी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला लाभते, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आरोग्य सेवा, भोजन सेवा, चरण सेवा, औषध वितरण यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. वारकऱ्यांच्या सेवेतूनच आम्हालाही या पवित्र वारीमध्ये सहभागी झाल्याचे समाधान आणि पुण्य लाभते. मानाच्या अश्वांचे मंदिरात आगमन हे या सेवाकार्याची शुभ सुरुवात ठरते.”

यावेळी ट्रस्टतर्फे वारकरी सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. आषाढी वारीदरम्यान आरोग्य तपासणी, मोफत वैद्यकीय सल्ला, मोफत औषध वितरण, भोजन सेवा, चरण सेवा, अवयव दान जनजागृती तसेच इतर सेवाभावी उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा केली जाणार असून या सर्व उपक्रमांची सुरुवात मानाच्या अश्वांच्या आगमनाने करण्यात आली.

follow us