स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक! पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा ‘देवाभाऊ पॅटर्न’, आमदार लांडगेंकडं मोठी जबाबदारी

पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये अशी जाबदारी देण्यात आली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 05T221653.037

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था (Election) निवडणुकीत ‘शतप्रतिशत भाजपा’ असा निर्धार करण्यात आला असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांनी नियुक्ती करीत ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याच्या तयारी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पवार यांचे ग्रामीण भागात चांगले वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हक्काचे दोन हुकमी एक्के बाहेर काढले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ अशी जबाबदारी देण्यात आली आहे. तर दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांना जबाबदारी सोपवली आहे. लांडगे आणि कूल दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पातळीवर आव्हान देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.

पुणे जिल्ह्याची निवडणूक सूत्रे भाजपने दिली मोहोळ यांच्याकडे, अजितदादा यांच्या विरोधात दुसरा सामना

मध्यंतरी आमदार महेश लांडगे यांनी ‘‘पुणे जिल्ह्याचे विभाजन करा आणि उत्तर पुणे जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ असे नाव द्या’’ अशी जाहीर मागणी केली होती. यावरुन अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही लांडगे यांनी पवार यांच्याविरोधात दंड थोपाटले होते. 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता खेचून आणली आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला काबिज केला होता.

दुसरीकडे, आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांनी 2019 मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी, 2009 मध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला मदत केली, त्यावरुन नाराज झालेल्या राहुल कुल यांनी सुरूवातीला रासप आणि 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. पवार कुटुंबियांना थेट आव्हान देणारा नेता म्हणून कुल यांची ओळख आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांना मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुणे उत्तर आणि दक्षिण दिग्विजय करण्यासाठी भाजपाने ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याचे निश्चित केले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पुणे जिल्ह्यात देवाभाऊंची ‘‘कमांड’’

विशेष म्हणजे, पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे असे मातब्बर असताना नवख्या गणेश बिडकर यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये माजी खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे असे नेते आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी न देता आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

तसेच, पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे धुरा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर ‘‘कमांड’’ मिळवली आहे, असे चित्र आहे.

पुण्यात बिडकर, पिंपरी-चिंचवडमध्ये जगताप…

पुणे महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना जबाबदारी दिली आहे. बिडकर आणि जगताप हेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरुन काही प्रमाणात कुरबुरी होत्या. पुण्यात घाटेंना आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काटेंना शहराध्यक्षपदी संधी दिल्यामुळे बिडकर आणि जगताप यांच्यात नाराजी होती, असे बोलले जाते.

या ‘गृहकलहाचा’ परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होवू नये. या करिता शहराध्यक्षांना निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी न देता पुण्यातून बिडकर आणि पिंपरी-चिंचवडमधून जगताप यांच्याकडे धुरा दिली आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर झाल्यास, जगताप आणि बिडकर यांना भाजपाच्या ‘‘परफॉर्मन्स’’ची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. किंबहुना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर रणनिती आखावी लागणार आहे.

 

Tags

follow us