सावधान: बुधवार पेठ ते घर… आयटी अभियंत्याचा पाठलाग करत बनवला व्हिडिओ

सावधान: बुधवार पेठ ते घर… आयटी अभियंत्याचा पाठलाग करत बनवला व्हिडिओ

Budhawar Peth Blackmail: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एक नवा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. शहरात फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याचं या घटनेनं समोर आलं आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका अभियंत्याचा पाठलाग करून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

संपूर्ण घटना कशी घडली?

पीडित अभियंता आणि त्याचा मित्र १३ जुलै रोजी कामानिमित्त बुधवार पेठ परिसरात गेले होते. तेथे बाईकवर थांबलेले असताना संशयित आयुष चौगुले (२२, रा. वाकड) आणि सदफ पठाण (२१, रा. वाकड) यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये याचा छुपा व्हिडिओ बनवला. दोन्ही आरोपींनी त्या अभियंत्याचा आणि त्याच्या मित्राचा पुण्यातील किरकिटवाडी येथील त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. पीडित अभियंता हा विवाहित असून, घटनेच्या वेळी त्याची पत्नी आणि मुले गावी गेली होती. घराजवळ पोहोचल्यावर, आरोपींनी अभियंत्याला थेट विचारलं की, ”तू बुधवार पेठेत का गेला होतास?” आणि नंतर व्हिडिओ दाखवून बदनामीची धमकी देत २० हजार रुपये मागितले.

ब्लॅकमेलिंग आणि बनावट तक्रार

पैसे न दिल्यास व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करून पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देण्यात आली.  त्यानंतर आयुष चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनी युवकाला घाबरवण्यासाठी आणखी एक डाव टाकला. ‘तू आमच्याकडून 20 हजार रुपये रोख घेतले आहेत. हे पैसे तू आम्हाला ऑनलाईन पद्धतीने परत देणार होतास. तू ते पैसे दिले नाहीस तर आम्ही पोलिसांत तक्रार करु. चौकशीवेळी आम्ही बुधवार पेठेतील तुझे व्हिडीओ आणि फोटो पोलिसांना देऊ. तुझी बदनामी करु’, असं आयुष आणि सदफने संबंधित तरुणाला सांगितले. त्यानंतरही हा तरुण त्यांना पैसे द्यायला तयार नव्हता. मग आरोपींनी पुढील डाव टाकला. त्यांनी स्वतः पोलीस हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांसमोर त्यांनी अभियंत्याने त्यांच्याकडून २० हजार रोख घेतल्याचा खोटा आरोप केला आणि आरोपींनीच तक्रारदार असल्याचं पोलिसांना भासवलं.

पोलिसांची तत्काळ कारवाई

पोलिसांनी सुरुवातीला आरोपींचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र स्थानिक पत्रकाराच्या हस्तक्षेपामुळे पीडित अभियंत्याला आपली बाजू विस्तृतपणे मांडता आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजू तपासल्या तेव्हा कटकारस्थान उघड झाले आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास नांदेड सिटी पोलीस करत  असून, अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे घडले आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube