संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 729 व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव साजरा
Saint Shri Dnyaneshwar Mauli: इंद्रायणीत वारकर्यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले.
पुणेः विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी-पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी तत्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच येथे वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला.
इंद्रायणीत वारकर्यांच्या गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. यावेळी विश्वरूप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला. तत्पूर्वी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. (Celebration of Roupya Mahotsav of Saint Shri Dnyaneshwar Maulincha 729th Sanjeevan Samadhi Sohla)
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र आळंदी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, हभप तुळशीराम कराडउषा विश्वनाथ कराड, तुळशीराम कराड, डॉ. उमेश नागरे, माइर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड, हरिहर महाराज दिवेगावकर, उद्धव महाराज मंडलिक, यशोधन महाराज साखरे, चिन्मय महाराज सातारकर या सारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरुपी सेवा सादर केली. तसेच प्रा. सुशांत दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, पंडित रघुनाथ खंडाळकर, सुरंजन व शुभम खंडाळकर, गायत्री गुल्याने, कार्तिकी व सुपुत्र कौस्तुभ कैवल्य गायकवाड, पूनमताई नळकांडे व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी विश्वशांती दर्शन हा अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
हभप बापूसाहेब मोरे देहूकर म्हणाले, सृष्टीवर संताच्या वचनामुळे मानवाचे कल्याण होते. संत हे वात्सल्यमूर्ती आहे. त्यांची महिमा शब्दात सांगता येत नाही. संत दुसर्यांचे दुःख सावरण्यास पुढे येऊन त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवतात.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊली चरणीसेवा रूजू केली. पुढील वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम व विश्वरुप दर्शन मंचावर होणार आहेत. रामेश्वर येथे विश्वधर्मी मानवता तीर्थभवनाची निर्मिती करून संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर माऊली आणि शांतीचा संदेश पोचविला जाईल. पवित्र तीर्थ क्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञान तीर्थ क्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतानी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
