काँग्रेसने भाकरी फिरवत पुणे जिल्ह्याचे केले दोन भाग; हायकमांडच्या आदेशामुळे दिग्गजांचे टेन्शन वाढले
Maharashtra Congress गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने काँग्रेसला आलेल्या पराभवामुळे पुणे काँग्रेसमधील मरगळ...
पुणे : पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी दोन शहराध्यक्षांच्या चर्चा सुरू असतांना आता तोच ‘फॉर्म्युला’ जिल्ह्यासाठीही लागू करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी आणि अंतर्गत गटबाजीला चाप लावण्यासाठी हायकमांडने आता ‘एक जिल्हा, दोन अध्यक्ष’ असा नवा फॉर्म्युला अमलात आणण्याचे निश्चित केले आहे. या प्रयोगामुळे पुणे काँग्रेसमध्ये आता सत्तेची दोन केंद्रं पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय निरीक्षक योगेश एच. सी. यांनी बुधवारी (दि.16) पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने काँग्रेसला आलेल्या पराभवामुळे पुणे काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी तसेच नेत्यांमधील गटबाजीला लगाम घालण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ‘संघटन सृजन’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याचे दोन भाग करून तिथे स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
असे असेल जिल्ह्याचे विभाजन (कार्यक्षेत्र)
जिल्ह्याची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन दोन स्वतंत्र कार्यक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. ज्यात ग्रामीण (शिरूर भाग) : यामध्ये शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांचा समावेश असेल. तर, बारामती अंतर्गत बारामती, दौंड, पुरंदर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष असेल.
महिन्याभरात नावे निश्चित होणार
जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असून त्याचा अहवाल हायकमांडला सादर केला जाणार आहे. येत्या महिन्याभरात या दोन्ही विभागांच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल, असे संकेत निरीक्षक योगेश एच. सी. यांनी दिले आहे.
काँग्रेससमोर अस्तित्त्व टिकवण्याचे आव्हान
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) यांच्याशी महाविकास आघाडी म्हणून समन्वय साधताना काँग्रेसला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. अशातच दोन जिल्हाध्यक्ष नेमल्यामुळे संघटनेला अधिक बळकटी मिळणार की गटबाजी आणखी वाढणार, याकडे लक्ष लागले आहे. ‘एक जिल्हा, दोन अध्यक्ष’ या प्रयोगामुळे कोणाची वर्णी लागते, याचीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
काँग्रेसचा हा नवा प्रयोग म्हणजे आगामी निवडणुकांसाठी केलेली मोठी बांधणी मानली जात आहे. मात्र, ‘एक जिल्हा, दोन अध्यक्ष’ या प्रयोगातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते की नेत्यांमधील अंतर वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पत्रकार परिषदेला विद्यमान जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, माजी आमदार रामहरी रूपनवर, निरीक्षक प्रशांत जगताप, अनंत मोहोद, विश्वजीत हाप्पे, माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.