पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे.
FDA’s big action in budhwar peth : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. मोठ्या प्रमाणात हा साठा आढळून आल्याने कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. जप्त केलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता तसेच हा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवात मिठाई, मोदक आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्यपदार्थ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट या ठिकाणी एफडीएच्या पथकाने छापा टाकला. साठवण्यात आलेले अन्नपदार्थ भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आली.
खंडणीसाठी माझ्या भाऊ-पुतण्याला मारहाण, मंत्री अतुल सावे यांचा गंभीर आरोप, कठोर कारवाईची मागणी
या कारवाईत फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प आणि क्रीमर असा एकूण 6 हजार 457 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची किंमत तब्बल 39 लाख 18 हजार 520 रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. तपासणीदरम्यान संबंधित खाद्यपदार्थांच्या लेबलवर ‘Use By Date’, पोषणमूल्यांची माहिती, पॅकिंगची तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक आढळून आला नसल्याचे समोर आले. त्यामुळे या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला असून, त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, भंडारा, अन्नछत्र, लंगर आणि इतर सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांसाठीही अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा कार्यक्रमांची माहिती कार्यक्रमाच्या किमान सात दिवस अगोदर संबंधित अधिकाऱ्यांना देणे आवश्यक राहणार आहे. परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर अथवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार करून वितरित केले जाणार असल्यास विहित नमुन्यात पूर्वसूचना सादर करावी लागणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे संकट, मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
यासोबतच अन्न तयार करताना आणि वाटप करताना स्वच्छता राखणे, सुरक्षित पाण्याचा वापर करणे, अन्नाचे योग्य तापमान राखणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि तयार अन्नाची सुरक्षित साठवणूक करणे बंधनकारक असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी एफडीएने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, पुणे आणि नाशिकमधील या मोठ्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.