H3N2 चिंता वाढली : अहमदनगरनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा मृत्यू!
पिंपरी : राज्यात H3N2 या विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात पहिला मृत्यू अहमदनगर शहरात झाला होता. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातही याचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत असून दुसरा मृत्यू पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील ७३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा झाला आहे. त्यामुळे सतत सर्दी, खोकला, ताप येणाऱ्या रुग्णांनी न घाबरता काळजीपूर्वक उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झालेल्या ७३ वर्षांच्या व्यक्तीला दमा आणि हृदयविकारासारखे काही गंभीर आजार देखील होते अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात सध्या H3N2 विषाणूग्रस्त चार रुग्ण आहेत. त्यांच्यावर ते राहत असलेल्या घरीच उपचार घेत असल्याची माहिती देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या H3N2 विषाणूची साथ ही आटोक्यात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ज्या लोकांना सर्दी, खोकला आणि ताप सारखी लक्षण आहेत. अशा रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे, अस आवाहन देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल आहे.
Eknath Shinde मराठा आरक्षणासाठी ॲड. हरिष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफणे म्हणाले की, वायसीएममध्ये ७३ वर्षांचा व्यक्ती ७ मार्च रोजी दाखल झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. या व्यक्तीला दमा आणि हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
सर्दी, खोकला, ताप येणे, थंडी वाजून येणे असा कोणालाही त्रास होत असेल ते त्या रुग्णांनी दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावे. घाबरून जाण्यासारखे काही नाही. हा आजार स्वाईन फ्लू सारखाच आहे. त्याच्यावर आपल्याकडे औषध उपलब्ध आहे. दुर्लक्ष न करता योग्य उपचार घेतले तर रुग्ण ठणठणीत बरा होतो, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.