विक्रम काकडेंना उमेदवारी पण, संजय काकडे कसे अडकले राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये?
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याच्या राजकारणात एका मोठ्या आणि धक्कादायक राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे.
Sanjay Kakade Join NCP But Why : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याच्या राजकारणात एका मोठ्या आणि धक्कादायक राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उद्योगपती संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना अनपेक्षितपणे उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीनंतर ‘पार्थ-विक्रम’ मैत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. पण या संपूर्ण प्रकरणामागे केवळ मैत्री नाही. त्यामुळे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू संजय काकडे महायुतीच्याच अंतर्गत राजकारणात कसे ‘ट्रॅप’ झाले, याची पडद्यामागची गणिते आता समोर येत आहेत.
केवळ पार्थ पवारांची मैत्री नाही तर, ‘राजकीय’ फायदा
विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांची घट्ट मैत्री संपूर्ण पुण्याला ठाऊक आहे. त्यामुळे सुरुवातीला या उमेदवारीमागे केवळ ‘मित्रप्रेम’ असल्याचे बोलले गेले. परंतु, पडद्यामागे राष्ट्रवादीने अत्यंत हुशारीने पत्ता टाकला होता. विक्रम यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी मोठी राजकीय गुगली टाकली. त्यांनी अट ठेवली की, केवळ विक्रम काकडे यांनीच नव्हे तर, स्वतः संजय काकडे यांनीही भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला पाहिजे. मुलाच्या राजकीय भविष्यासाठी शेवटी काकडेंना हा चक्रव्यूह भेदता आला नाही आणि ते यात अडकल्याचे सांगितले जात आहे.
पुण्याच्या राजकारणातील ‘किंगमेकर’
संजय काकडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे महाराष्ट्राच्या, विशेषतः पुण्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण, संजय काकडे हे जोडतोडीच्या राजकारणातील ‘मास्टरमाइंड’ मानले जातात. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपचे 92 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात काकडेंच्या ‘इलेक्शन मॅनेजमेंट’चा सिंहाचा वाटा होता. आता तेच काकडे राष्ट्रवादीत आल्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद प्रचंड वाढणार आहे.
2017 मध्ये काकडे यांची पुण्यात भाजपची एकहाती सत्ता आणण्यामागे त्यांची मोठी भूमिका होती. इतर पक्षांतील नाराज आणि बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणणे, त्यांना तिकिटे देणे आणि निवडून आणणे ही किमया काकडेंनी करून दाखवली होती. याच कामगिरीमुळे त्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले होते.
राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटवणार?
काकडे हे आजवर देवेंद्र फडणवीसांचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जायचे. भाजपमधील अंतर्गत बंडाळी शमवणे किंवा इतर पक्षांतील बडे नेते पक्षात आणणे यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या राष्ट्रवादीत (अजित पवार गट) सुरू असलेले अंतर्गत मतभेद आणि नाराजी दूर करण्यासाठी काकडेंच्या या कौशल्याचा पक्षाला मोठा फायदा होईल.
‘मराठा’ समीकरणांवर पकड
संजय काकडे हा मराठा समाजातील एक मोठा आणि वजनदार उद्योजक चेहरा आहे. सध्या राज्यातील मराठा आरक्षणाचे वातावरण आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता, काकडेंसारखा नेता सोबतीला आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदारांना आकर्षित करणे राष्ट्रवादीला सोपे जाणार आहे.
पडद्यामागील रणनीतीकार
संजय काकडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय हाय-प्रोफाईल नाव आहे. एक यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक ते राज्यासभा खासदार आणि पुण्याच्या गल्लीपासून ते भाजपच्या सर्वोच्च वर्तुळापर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे जे संजय काकडे कालपर्यंत भाजपचा विस्तार करण्यासाठी पडद्यामागून सूत्रे हलवत होते, तेच काकडे आता मुलाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत.