पिंपरी चिंचवडमध्ये महापौर गायब, चुलत भावाकडं कारभार दिल्याने राजकीय चर्चांना उधाण

विविध मंत्र्यांच्या भेटी घेत शहर विकासासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 02 25T204323.382

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या दालनाचा ताबा चुलत भाऊ प्रवीण लांडगे घेत असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. महापौर मुंबई दौऱ्यावर असताना प्रवीण लांडगे यांनी दालनात येणाऱ्या पाहुण्यांकडून महापौरांचा सत्कारही स्वतः स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळं महापौरांच्या चुलत भावाला महापौरपदाचं अधिकार देण्यात आले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

महापौर रवी लांडगे हे मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यासह विविध मंत्र्यांच्या भेटी घेत शहर विकासासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. शहरासाठी निधी व प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दुसरीकडं पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर दालनात प्रवीण लांडगे दिवसभर उपस्थित राहून कामकाज पाहत असल्याचं चित्र दिसलं. महापौर नसताना आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकणं, अधिकाऱ्यांशी संवाद साधणं आणि कामांचा पाठपुरावा करणं ही भूमिका ते बजावत असल्याचं सांगितलं जातं.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध विषय समिती सदस्यांची निवड

महापौरांनी काही कामांची जबाबदारी प्रवीण लांडगे यांच्यावर सोपवली असल्याचं बोललं जात असलं तरी त्यांच्या अनुपस्थितीत दालनाचा ताबा घेणं आणि सत्कार स्वीकारणं याबाबत अधिकृत आदेश आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. आज प्रवीण लांडगे यांनी महापौरांच्या स्वीय सहाय्यकांसोबत पालिका इमारतीत फेरफटका मारल्याचंही दिसून आलं. ते कोणत्या अधिकाऱ्यांना भेटले, कोणत्या कामांचा पाठपुरावा करत होते आणि हे सर्व कोणत्या अधिकारवाणीने करत होते, याबाबत स्पष्टता नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

महापौर रवी लांडगे पदावर आल्यानंतर एखादा दिवस वगळता प्रवीण लांडगे दालनात नियमित उपस्थित असल्याचे काही सदस्य सांगतात. त्यामुळे महापौर नसताना प्रवीण लांडगेच सूतंरे हातात घेतात का? अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात ऐकू येत आहे. महापौरांच्या चुलत भावाचा हा उपक्रम महापौरांच्या संमतीने सुरू आहे की त्यांना याची कल्पनाच नाही, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी स्वतः महापौर रवी लांडगे काय स्पष्टीकरण देतात, याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे.

follow us