Kasba Bypoll : जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरले!

Kasba Bypoll : जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गल्ली बोळात फिरले!

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आखेर थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपकडून (BJP) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जोरदार प्रचार केला. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे कसबा पोटनिवडणूक अशी आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अगदी गल्ली बोळात फिरले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनीही तोडीस तोड उत्तर देत जोरदार प्रचार केला. तर या दोन मुख्य पक्षात निवडणूक होत असतानाच ज्यांचा निवडणुकीशी काहीही संबंध नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये वेगळेच नाट्य पहायला मिळाले. त्यामुळे त्या पक्षाची चर्चा देखील जोरदारपणे झाल्याचे पाहायला मिळाले.

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार थंडावला. आता येत्या रविवारी (दि. २६) होणाऱ्या मतदानाकडे लक्ष लागले आहे. तर २ मार्च रोजी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे.

Devendra Fadanvis यांचा पुन्हा गौप्यस्फोट… शिंदे ‘सुरत’मध्ये असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता!

कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी ‘रोड शो’ तसेच चौकचौकात कोपरा सभा, रॅली, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे, व्यापारी मेळावे घेऊन जोरदार प्रचार केला. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सभा, बैठका, रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला. कसब्याची ही पहिलीच निवडणूक असेल ज्यात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही अगदी गल्ली बोळात जाऊन प्रचार केला. व्यापारी मेळावे, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे घेतले. तर भाजपच्या १०० नगरसेवकांना घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत जोरदार प्रचार केला.

या सर्व घडामोडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अगदी सुरुवातीलाच आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अचानकपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर या पक्षात अनेक घडामोडी घडल्या. ज्यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या पदाधिकाऱ्यांचा समर्थनार्थ शहरातील ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने मनसेची निवडणूक न लढवताही खूपच बोलबाला झाला. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube