Aaditya Thackeray : खोक्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना जनता घरी पाठवणार!
पुणे : आजची लढाई ही महाराष्ट्र, देश कुठे जाणार आहे. हे सांगणारी आहे. गद्दारांनी, चोरांनी कितीही चोरी केली तरी त्यांचे नाव श्रीमंत लोकांच्या यादीत येणार नाही. तर चोरांच्याच यादीत या गद्दारांचे नाव येणार आहे. केवळ खोक्यासांठी शिवसेनेशी एकनाथ शिंदे आणि ४० जणांनी गद्दारी केली आहे. पण या गद्दारांना जनतेच्या न्यायालयात भरपाई करावीच लागणार आहे. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्याची सुरुवात येथील जनता करेल. म्हणूनच मी म्हटले की आजची ही पोटनिवडणूक महाराष्ट्र आणि देश कुठल्या दिशेने जाणार आहे, हे दाखवणारी असेल, असे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेत युवासेनेचे आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे आमदार सुनील केदार, उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, हे ४० लोकं डरपोक गद्दार आहेत. त्यांनी शिवसेना, महाविकास आघाडीसह संपूर्ण महाराष्ट्राशी त्यांनी केवळ खोक्यासाठी गद्दारी केली आहे. आज देशाचे आणि जगाचे या दोन पोटनिवडणुकीवर लक्ष लागले आहे. ४० आमदारांनी केलेल्या गद्दारीचा बदला या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीत येथील जनता घेणार आहे.
आज तुम्ही या ४० गद्दारांबद्दल बोलला की लगेच तुमच्या मागे पोलिसांचा ससेमीरा लावला जात आहे. खोट्या केसेस टाकून जेलमध्ये टाकले जात आहे. नाहक त्रास दिला जात आहे. पण सत्ताधारी गद्दारांकडून कितीही त्रास, खोट्या केसेस केल्या तरी जनता त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवणार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दारांना आदित्य ठाकरे यांनी लगावला.