पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार ! सोमवारी मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मातीपूजन समारंभ

Maharashtra Kesari-68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 स्पर्धेच्या अनुषंगाने वासापूजन व मातीपूजन समारंभ हा मंगल सोहळा होणार आहे

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Mahrashtra Kesari Murlidhar Mohol

Maharashtra Kesari:महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari) वाघोलीत होणार आहे. या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. वासापूजन आणि मातीपूजन समारंभ सोमवारी (2 मार्चला) होणार आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 स्पर्धेच्या अनुषंगाने वासापूजन व मातीपूजन समारंभ हा मंगल सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी विधीपूर्वक वासापूजन व मातीपूजन करण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्रातील 42 जिल्हा कुस्तीगीर संघांकडून 42 जिल्हाच्या मातीचे कलश आणून त्या मातीत ही ऐतिहासिक कुस्ती स्पर्धा होणार आहे. तसेच, यावेळी 68 वी महाराष्ट्र केसरी 2025-26 च्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच देण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या भव्य बक्षिसाची घोषणा होणार आहे. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा देखील याच कार्यक्रमादरम्यान आयोजकांकडून करण्यात येणार आहे. यामुळे कुस्तीप्रेमी व क्रीडा क्षेत्रात पहिल्या बक्षीसाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमासाठी वाघोली परिसरातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच राज्यभरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या विधीबद्दल संपूर्ण परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्रातील मल्लांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून सर्व कुस्तीप्रेमी स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच स्पर्धेसाठीच्या वासापूजन व मातीपूजन कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण सातव पाटील तसेच समस्त ग्रामस्थ वाघोली व पंचक्रोशी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

follow us