‘शिंदे-फडणवीस रागावले’; रवींद्र धंगेकरांनी कारणही सांगून टाकले..

‘शिंदे-फडणवीस रागावले’; रवींद्र धंगेकरांनी कारणही सांगून टाकले..

Pune News : पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेत आमदार बनलेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चर्चेत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, येथे धंगेकर यांनी जबरदस्त कामगिरी करत भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता धंगेकर त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. त्यानंतर त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीची चर्चा होत आहे.

आमदार धंगेकर सोलापुरात काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनसाठी गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना म्हणालो, की अजित पवार आमचे नेते आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत, त्यांना काय मला सुद्धा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री व्हावं. या पलीकडे मी काहीच बोललो नाही, असे धंगेकर म्हणाले.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी धंगेकर यांच्याही नावाची चर्चा होत आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, की महाविकास आघाडीचे नेते यावर निर्णय घेतील. हा माझा विषय नाही. पक्षानं जो उमेदवार दिला त्याला निवडून आणण्याचं काम मला करावं लागेल, असे धंगेकर म्हणाले.

शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर  राग 

शिंदे-फडणवीस यांचा आपल्यावर राग असल्याचेही ते म्हणाले. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटलेच नाहीत. त्यांचा माझ्यावर राग आहे. कारण, त्यांनी इतके पैसे वाटूनही पराभव स्वीकारावा लागला. पुणेकरांनी त्यांना माघारी पाठवलं. या पराभवातून ते अजून बाहेर पडलेले नाहीत, असा टोला धंगेकर यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube