धक्कादायक! पैसे घेऊन नापासांना पास केले; पुण्यात बनावट विद्यापीठाचा भांडाफोड

धक्कादायक! पैसे घेऊन नापासांना पास केले; पुण्यात बनावट विद्यापीठाचा भांडाफोड

Pune Crime News :  दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा पास झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन गोलमाल करणाऱ्या एका बनावट विद्यापीठाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे विद्यापीठ दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करत होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांनी आतापर्यंत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘अलहिंद विद्यापीठ’ या नावाचे अस्तित्वात नसलेले विद्यापीठ वेबसाइट तयार करुन या माध्यमातून नापास असलेल्या विद्यार्थ्यांना ३० ते ५० हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देत होते. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

टोळीचा मुख्य सूत्रदार छत्रपती संभाजीनगरचा असून त्याने मागील चार वर्षापासून बनावट पदव्यांची ४० ते ६० हजारात बनावट प्रमाणपत्र वाटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गैरव्यवहारातून पैसा जमा करुन पुढील दोन वर्षात संभाजीनगर येथे त्यास जमीन घेऊन स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करायचे होते. आतापर्यंत ३५ बनावट प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिक्षणाच्या नावाखाली पैसे घेऊन खोटे प्रमाणपत्र दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारांतून विद्यार्थ्यांचीही मोठी फसवणूक होत आहे. या टोळीला पकडून पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. आता यामागे आणखीही कुणी आहे का, कशा पद्धतीने हे रॅकेट काम करत होते याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube