अंगावर हुडी, तोंडावर मास्क अन् तो भयानक प्लॅन; केतनचा मारेकरी चेनतचा फोटो समोर

संशयित आरोपी चेतन चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

News Photo   2026 06 24T105820.441

संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला त्या पुण्याच्या (Crime) लोहगडावरील हत्या प्रकरणात नवे नवे खुलासे समोर येत आहेत. फोटोची पोज देताना केतन अग्रवाल घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. होणाऱ्या भावी पत्नीसह तिच्या प्रियकराला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पत्नीच्या वाढदिवसामुळं केतन आणि होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी फोटोची पोज देताना केतन घसरुन पडला, असं समोर आलं होतं. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात हा बनाव असल्याचं उघड झालं आहे. होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं. एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं.

लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल

त्याचबरोबर लोहगडावर आधी केतन आणि सिया पोहचले होते. त्यानंतर चेतनही लोहगडावर दाखल झाला होता. तसेच केतनला लोहगडावरुन ढकलण्याआधीचा फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये चेतनने तोंडावर काळं मास्क, अंगावर हूडी, डोक्यावर हेडफोन्स घालून लोहगडावर एन्ट्री केली. तसेच केतनचं चेतनकडे लक्ष जाऊ नये यासाठी जेव्हा एकमेकांच्या बाजूने जातात तेव्हा सिया लगेच पाठमोरी उभी राहते. त्यामुळे केतनचं लक्षही सियाकडे जातं.

संशयित आरोपी चेतन चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं होतं. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. यामुळे या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचला. सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेलं. नंतर प्रियकर चेतन चौधरी यालाही तेथे बोलावून घेतलं. लोहगड किल्ल्यावर दोघांनी केतनला डोंगरावरून खाली ढकलून दिलं व त्याचा खून केल्याचं चेतनने चौकशीत सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

follow us