चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे डबल इंजिन, अजित पवार-जयंत पाटलांचा ‘खतरनाक’ रोड शो
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुक आणि कसबा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांकडून सभांचा, रॅलींचा धडका सुरू आहे. एकीकडे कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय जातं आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रावादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आले. या रोड शोमध्ये अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थितीत होते. या रोड शोमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश दिसत आहे.
ओपन कारमधून लोकांना अभिवादन करत अजित पवार निघाले तेव्हा नागरिकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. या रोड शोमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः अजित पवारांच्या या रोड शोला तरुणाईची तुफान गर्दी उसळली असून हे पवारांचे शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी शेकडो लोक रस्त्याच्या कडेला उभे आहेत. अजित पवार हे हात उंचावून उपस्थितांचं अभिवादन स्वीकारत होते.
त्यांच्यासोबत काही स्थानिक नेतेदेखील उपस्थित आहेत. या रोड शोमध्ये पवारांनी हातात घड्याळाचं पोस्टर दाखवून मतदारांना नाना काटे यांना विजयी करा, असं सांगत आहेत. रोड शोमध्ये मोठ्या संख्येने चिंचवडकरही उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली आहे. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्ये अजित पवार जिंदाबाद… नाना काटे जिंदाबाद, अशा घोषणा देत आहेत.
Uddhav Thackeray : त्यांच्यासोबत गेलं तर धुतलं तांदूळ अन् आमच्यासोबत तांदळाचे खडे…</a>
अजित पवारांना पाहण्यासाठी, त्यांच्या हातात हात मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहेत. रोड शोच्या मार्गावर कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी अजित पवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचं बघायला मिळालं. तर काही कार्यकर्त्यांनी रोड शोमध्ये ठेकाही धरल्याचं पाहायला मिळालं.