पुण्यातील पब संस्कृती पुन्हा चर्चेत; मुंढव्यातील बॅस्टियन पबमधील अश्लील व्हिडिओ व्हायरल

Bastian Pub : आयटी सिटी आणि तरुणाईचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Bastian Pub

Bastian Pub : आयटी सिटी आणि तरुणाईचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंढवा परिसरातील नामांकित बॅस्टियन पबमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये शेकडो लोकांच्या गर्दीत एका तरुण-तरुणीकडून अश्लील चाळे सुरू असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे शहरातील पब संस्कृती, नियमांचे उल्लंघन आणि पोलिसांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ मुंढव्यातील (Mundhwa) बॅस्टियन पबमधील (Bastian Pub) असल्याचा दावा केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान डान्स फ्लोअरवर तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, आजूबाजूला मोठी गर्दी असतानाही कुणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.

या घटनेमुळे पुण्यातील पब संस्कृतीवर पुन्हा टीका होऊ लागली आहे. रविवारी रात्रीच पुण्यातील एका पबमधून बाहेर पडलेल्या वकील तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. कारमध्येच तिच्यासोबत अश्लील चाळे आणि अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी बॅस्टियन पबमधील हा व्हिडिओ समोर आल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा आहे. शहरातील बहुतांश पबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी असताना, हा पब पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू राहत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे का? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

US-Iran War : इराणवर हल्ला करु नका, आखाती देशांची विनंती…डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक नागरिकांनी पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, नियमबाह्य वेळेत सुरू असलेले पब आणि वाढती गुन्हेगारी यावर कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली, तरी व्हायरल व्हिडिओची पडताळणी आणि संबंधित पबच्या परवान्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us