‘असं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नको’; विमान प्रवाशाने मुरलीधर मोहोळांना सुनावले…

विमानसेवेच्या भोंगळ कारभारावरुन एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सुनावले.

Murlidhar Mohol Airoplane Pravasi

Plane Passenger On Murlidhar Mohol : नांदेड विमानसेवेच्या अनियमित कारभारावरून एका प्रवाशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना थेट टार्गेट केलंय. या प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान आलेल्या गैरसोयींचा पाढा वाचत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. विमानाच्या वेळांमध्ये वारंवार बदल होणे, शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळणे आणि तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळणे, या मुद्द्यांवरून प्रवाशाने संताप व्यक्त केला. आम्हाला असं थर्ड क्लास सुशासन नको, या शब्दांत या प्रवाशाने संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये प्रवासी म्हणाला, पुणे–नांदेड आणि नांदेड–पुणे प्रवासाचे नियोजन करताना विमानसेवेच्या वेळापत्रकात सातत्याने बदल करण्यात आले. आधीच तिकीट आरक्षित केलेले असतानाही प्रवासाच्या वेळेत बदल होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः लहान मुले आणि मोठ्या सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांनी ऐनवेळी पर्यायी व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच यापूर्वीही या समस्येबाबत ईमेलच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा संबंधित प्रवाशाने केला. मोहोळ हे आपल्या जिल्ह्याचे मंत्री असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपला संताप व्यक्त करताना प्रवाशाने म्हटले, मोठमोठ्या गप्पा आणि जाहिराती नकोत, असलं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नकोय, असं प्रवाशाने म्हटलंय.

पुढे त्यांनी विमानसेवेच्या कार्यपद्धतीवर आणि उडाण योजनेच्या प्रसिद्धीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उडाण योजनेच्या मोठमोठ्या जाहिराती केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात पुढे होत काहीच नाही. लहान विमान कंपन्या प्रवाशांचा छळ करत आहेत, मन की बातमध्ये प्रशासनाच्या गप्पा मारल्या जातात; पण प्रत्यक्षात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नकोय. पेपरमध्ये दिसणाऱ्या मोठमोठ्या योजना बंद करा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केलीयं.

तसेच एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला तुमच्या मतदारांना साधा रिप्लायही देता येत नाही, असा थेट सवालही त्यांनी केला. दरम्यान, पुणे–नांदेड विमानसेवेच्या नियोजनातील कथित त्रुटी आणि प्रवाशांच्या तक्रारींमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रवाशाच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ किंवा संबंधित विमान कंपनीकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागलंय.

follow us