Pune Loksabha : भाजप, महाविकास आघाडीतील नेत्यांना खासदारकीचे डोहाळे; बाहेरुन दोस्ती आतून कुस्ती

Pune Loksabha : भाजप, महाविकास आघाडीतील नेत्यांना खासदारकीचे डोहाळे; बाहेरुन दोस्ती आतून कुस्ती

विष्णू सानप :

पुणे शहरात सध्या लोकसभा पोटनिवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. ही पोटनिवडणूक होणार की नाही याबाबतची चर्चा काही दिवसांपर्यंत सुरु होती. मात्र प्रशासनाने तयारी सुरु केल्याने ही पोटनिवडणूक होणारचं हे स्पष्ट झालं आहे. आता हा निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो असे चित्र आहे. (Pune Lok Sabha byelection 2023, Congress, NCP, BJP)

पोटनिवडणुकीसाठी कर्नाटक निवडणूक संपन्न झाल्यानंतर बंगळुरूहून पुण्याला 4 हजार 200 मतदान यंत्रे आणि 5 हजार 70 व्हीव्हीपँट मशिन्स दाखल झाली आहेत.  या मशिन्सवर पुणे पोटनिवडणूक (Pune By Election) असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. यासोबतच 30 इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या अद्यायावत करणे आणि मतदान केंद्रे निश्चित करण्याची काम पण पूर्ण झाली आहेत.

प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच राजकीय पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. सोबतच सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनीही फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. यामध्ये बॅनरबाजी, प्रसार माध्यम किंवा अन्य माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेकांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, पक्ष शिस्तीमुळे ही इच्छा जाहीर व्यक्त केली जात नाही. जो तो पक्ष सांगेल तो उमेदवार असेल असे म्हणतं आहेत. एकूणचं सर्वजण बाहेरून एकमेकांमध्ये दोस्ती दाखवत आहेत. पण आतून सगळ्यांचीच एकमेकांमध्ये कुस्ती पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीची 2 पातळ्यांवरील लढाई :

पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 2 पातळ्यांवरील लढाई लढायची आहे. उमेदवाराची निवड हा प्रश्न तर समोर आहेच. पण याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतदारसंघावरुनही संघर्ष पाहायला मिळतं आहे. आघाडी धर्माप्रमाणे पुण्याचा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तर मावळ, शिरुर आणि बारामती हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र आता पुण्याचा मतदारसंघ मागील 2 निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेला नाही. तसंच शहरात राष्ट्रवादीची ताकद आहे असा दावा करत हा राष्ट्रवादीने या मतदारसंघाची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आणि नेते दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचवेळी पुण्याची जागा काँग्रेसच लढविणार असं म्हणतं काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी आणि कसब्याचे आमदार धंगेकर यांच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत. एकूणचं महाविकास आघाडीला 2 पक्षांसोबतच उमेदवारांबाबतही निर्णय घ्यायचा आहे.

भाजपकडून इच्छुकांची मांदीयाळी :

पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट इच्छुक आहेत. सर्वाधिक इच्छुकांची यादी भाजपकडेच आहे. मात्र, पक्षीय शिस्त म्हणून अनेकजण गोलमाल बोलत असून आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहेत, हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्यामध्ये फार सख्य आहे असा त्याचा अर्थ होत नाही.

पक्षांतर्गत धुसफूस शिगेला :

भाजपकडून बापट कुटुंबीयांना तिकीट मिळालं तर नाराजांची यादी मोठी आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जागा सोडायची की काँग्रेस लढवणार हा गुंता अजून कायम असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्येच जागेवरून जुंपली आहे. आघाडी धर्म पाळायचा म्हणून कोणी कोणावर थेट बोलत नाही. मात्र, खाजगीत बोलत असताना हेच नेते एकमेकांचा उद्धार करतात थकत नाहीत. याला अपवाद भाजपमधील नेते मंडळीही नाही.

महाविकास आघाडी म्हणून ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडते की, पवारांच्या जिल्ह्यातील एकमेव लोकसभेची जागा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय भाजपमध्ये देखील तसाच प्रकार असून पुण्यातील ब्राह्मण वर्चस्व भाजपकडून कायम ठेवत बापट कुटुंबीयांना उमेदवारी दिली जाते की नवीन चेहरा शहरासाठी तयार केला जातो. हे चित्र आगामी पोटनिवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोटनिवडणुकीपूर्वी सर्वच पक्षातील इच्छुक आपल्या स्पर्धक उमेदवारांच्या ताकदीचा हिशोब मांडून एकमेकांना हिणवत आहेत. आता लाखों पुणेकरांच्या सेवेचा खासदार म्हणून योग कुठल्या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या प्रारब्धात आहे. हे काळच ठरवेल. मात्र, तूर्तास तरी पक्षांतर्गत धुसफूस शिगेला पोचली आहे. हे मात्र नक्की.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube