पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचवणार? आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाठीशी शिवसेना; CM फडणवीसांना पत्र
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाठिशी शिवसेना असून ठाकरे गटाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.
Pune News : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांच्यावर कथित राजकीय दबाव आणून त्यांना धमकावल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करण्यासाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी करत शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या सुमारे ९० कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदा प्रक्रियेत एका भाजप आमदाराने आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला असून, या घटनेला आयुक्तांनी दुजोरा दिल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
लंकेचा रावण दहा तोंडाचा होता मात्र पुणे महापालिकेत अनेक तोंडांचे रावण महापालिकेचे लचके तोडण्यासाठी या रामावर तुटून पडत आहेत. या रामाला कोण वाचवणार? असा सवाल पत्रातून करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, संबंधित निविदा इतर ठेकेदारांच्या तुलनेत अधिक दराची असल्याने महापालिकेचे सुमारे नऊ कोटी रुपये वाचल्याची माहिती समोर आल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. पुणेकरांच्या कररूपी पैशांची बचत करण्यासाठी नियमांनुसार निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावरच जर राजकीय दबाव येत असेल, तर हा प्रकार गंभीर असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयुक्त नवल किशोर राम यांनी नियमानुसार घेतलेल्या निर्णयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता राहावी, पुणेकरांच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा आणि प्रशासनाचा कारभार राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालावा, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संबंधित आमदाराकडून आयुक्तांना धमकी दिल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी, निविदा प्रक्रियेतील कथित राजकीय हस्तक्षेपाची चौकशी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण आणि निविदेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांना राजकीय दबावाशिवाय काम करता येणे ही लोकशाही व्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी या प्रकरणात तत्परतेने लक्ष घालून आयुक्त नवल किशोर राम यांना अभय द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय आता या पत्राची आणि करण्यात आलेल्या मागण्यांची काय दखल घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. हे पत्र शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मोरे आणि पुणे मनपा गटनेते नितीन गावडे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.