Pune News : पुण्यातील भिडेवाडा अखेर महापालिकेच्या ताब्यात; पोलीस बंदोबस्तात कारवाई

Pune News : पुण्यातील भिडेवाडा अखेर महापालिकेच्या ताब्यात; पोलीस बंदोबस्तात कारवाई

Pune News : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात ज्या ठिकाणी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा काल रात्री पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आला. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात वाड्याचा ताबा घेतला. या वाड्याच्या आजूबाजूला असलेली दुकाने आणि अतिक्रमणाचे काम काल रात्रीपासूनच सुरू करण्यात आले. वाहतूक कोंडी होईल त्यामुळे रात्री अकरा वाजल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या वाड्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात खटला सुरू होता. हा खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला.

Pune News : ‘अजितदादा चलाख अन् धुर्त’ चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने पुन्हा दादा विरुद्ध दादा?

महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी या पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली होती. देशात मुलींसाठी ही पहिलीच शाळा होती. त्यानंतर या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समितीने केली होती. या मागणीला पुणे मनपा आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दाखवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निर्णय देत वाडा पालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काल रात्री महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हा वाडा ताब्यात घेतला. त्यामुळे आता पुण्यातील भिडे वाडा याठिकाणी राष्ट्रीय स्मारक लवकरच उभे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिल्यानंतर पुणे महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेण्यास सुरुवात केली. पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुकाने हटवण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने भिडे वाड्याचे मालक आणि भाडेकरूंना नोटीस देऊन पंचनामा केला. सोमवारी रात्री उशिरा पालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाड्यातील जागेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. या जागेचे भूसंपादन करण्यात महापालिकेला अखेर यश आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube