Pune News : ‘राहुल गांधींचा कॅच घेणार, शून्यावर आऊट करणार’; आठवलेंची क्रिकेटस्टाईल फटकेबाजी
Pune News : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल (IND vs AUS Final) मॅच सुरू आहे. सामना पाहण्यासाठी लाखो लोक हजर आहेत. राजकीय नेतेमंडळीही सामना पाहत आहेत. सगळीकडेच विश्वचषकाचा फीव्हर असताना राजकारणही याला अपवाद राहिलेलं नाही. आज पुण्यात (Pune News) आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी क्रिकेटच्याच भाषेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खोचक टीका केली.
आठवले म्हणाले, आजचा दिवस बोलण्याचा नाही. तर सामना पाहण्याचा आहे. मी मात्र सामना पहायला गेलो नाही. अहमदाबादमध्ये जाऊन सामना पाहण्यापेक्षा पुणे शहरात राहून सामना पाहण्यात आनंद आहे. यानंतर मंत्री आठवले यांनी खास त्यांच्या स्टाइलमध्ये राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मला इशारा देत माझं वॉच, रोहित शर्माची विकेट घेणार ऑस्ट्रेलियाच्या दहा कॅच, का जिंकणार नाही आपण ही मॅच? ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. मोदींच्या टीमनेही चांगली तयारी केली आहे. मी राहुल गांधींचा कॅच घेणार. मी तर त्यांना शून्यावरच आऊट करणार.
रिपाईला मंत्रिपद द्या! केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम
राजकारणाच्या खेळात तयारी करून खेळायचं असतं. मोदी अॅक्टिव्ह खेळाडू आहेत. 2024 ची आमची चांगली तयारी आहे. आम्ही 350 रन करणार आहोत. तुम्ही 350 केले तर आम्ही 400 रन करू. आम्हाला एनडीएचं सरकार आणायचं आहे, असे आठवले म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना आमचा पाठिंबा
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरही रामदास आठवले यांनी भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी योग्य असे काम चालू आहे. जात निहाय जनगणना केली पाहिजे. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीमधून मिळालेले आरक्षण हे कोर्टामध्ये टिकणार नाही. जरांगे पाटील व छगन भुजबळ यांनी आपापसातील वाद मिटवावा असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.
सरकारला माझी विनंती आहे ज्या पद्धतीने तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण आहे. त्यामध्ये तीस टक्के आणि वीस टक्के अशा ओबीसींच्या दोन कॅटेगरी आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीत न टाकता म्हणजे पहिल्या ओबीसी यादीत न टाकता त्यांच्यासाठी स्वतंत्र यादी तयार करावी आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. राज्य सरकारला तो अधिकार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी.. रामदास आठवलेंची कविता ऐकताच शाह हसले