देवाभाऊंना नाकीनऊ आणण्याचं होतं पण, बिचुकलेंची गाडी शिक्षकांनी 19 मतांवरच अडकवली…

Abhijit Bichukale लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा. मला तुम्ही विजयी केलं तर, मी देवाभाऊंच्या नाकीनऊ आणेन, असंही अभिजीत बिचुकले म्हणालेले.

  • Ninad K
  • Written By: Published:
Abhijit Bichukale

Abhijit Bichukale Got Only 19 Votes In Pune Teachers Constituency Election : निवडणूक कोणतीही असो, मैदानात उतरायचं, मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि दिग्गजांना आव्हान द्यायचं… ही ओळख बनली आहे अभिजीत बिचुकले यांची. कधी साताऱ्यात, कधी मुंबईच्या वरळीत, कधी बारामतीत, तर कधी लोकसभा निवडणुकीत. आपल्या हटके विधानांमुळे बिचुकले कायम चर्चेत राहिले. पण यावेळी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपेटीतून आलेला आकडा मात्र त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या अगदी उलट आहे. ‘मैं खड़ा तो सरकार से बड़ा’ अशी आरोळी ठोकणाऱ्या बिचुकले यांना या निवडणुकीत अवघी 19 मतं मिळाली आणि त्यांचा प्रवास मतमोजणीतच थांबला. पण बिचुकले यांच्यासाठी हा केवळ एका निवडणुकीतील पराभव नाही. त्यांच्या आजवरच्या निवडणूक प्रवासाकडे पाहिलं, तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांची जिद्द कायम आहे; पण ती मतांमध्ये रूपांतरित करण्यात त्यांना वारंवार अपयश आलं आहे.

Pune Graduate Election Result : वडिलांना आमदार होता आलं नाही पण, पवारांनी लेकीला आमदार केलं…

घोषणा मोठ्या, पण मतांचा आकडा फक्त 19

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिचुकले यांनी नेहमीच्या शैलीत विरोधकांना आव्हान दिलं होतं. शिक्षक काय करतात, हे आम्हालाही चांगलं माहिती आहे. तसेच, पदवीधरांनी मला निवडून दिलं, तर तुम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागणार नाही. तुमचे लीडर लेचेपेचे आहेत. लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा. मला तुम्ही विजयी केलं तर, मी देवाभाऊंच्या नाकीनऊ आणेन, असंही अभिजीत बिचुकले म्हणालेले. माझं एकच ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे…मैं खडा तो सरकारसे बडा… असं म्हणत पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी बिचुकले यांनी इतर उमेदवारांना आव्हान दिलं होतं. मात्र, शिक्षक मतदारांनी त्यांच्या या आव्हानाला केवळ 19 मतांचा प्रतिसाद दिला. बिचुकले यांना केवळ 19 मतं मिळाली. त्यामुळे त्यांना निवडणुकीतून बाद व्हावं लागलं.

बिचुकले यांचा निवडणूक प्रवास; कुठे किती मतं मिळाली?

अभिजीत बिचुकले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत विविध ठिकाणी नशीब आजमावलं आहे. त्यांच्या काही प्रमुख निवडणुकांच्या निकालावर कटाक्ष टाकला तर, 2004 च्या सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी स्थानिक राजकारणातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना विजय मिळाला नाही. 2014 मध्ये सातारा लोकसभा निवडणुकीसाठी थेट उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दंड थोपटले होते पण, त्यांना केवळ 3,677 मतं मिळाली.

सातारा विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात त्यांना अवघे 392 मतं मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये वरळी आणि सातारा विधानसभांमध्ये ते मैदानात उतरले होते. वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बिचुकले यांनी निवडणूक लढवली. तेथे त्यांना 781 मतं मिळाली. तर, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात 759 मतं मिळाली.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 2020 मध्येही बिचुकले यांनी नशीब आजमावलं होतं. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना प्रथम पसंतीची 56 मतं मिळाली. या निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला नाही अशा अनेक निवडणुका आहेत जेथे बिचुकले दंड थोपटून मैदानात उतरले पण, विजयाची माळ काही स्वतःच्या गळ्यात पाडू शकले नाही.

Pune Teachers Election : चंद्रकांत पाटलांची निवड योग्य ठरली… भाजपसाठी अवघड मतदारसंघात गुलाल

प्रसिद्धी मिळाली, पण मतपेटीतल्या आकड्यांचं काय?

बिचुकले यांचं नाव केवळ निवडणुकांमुळेच चर्चेत आलं असं नाही. ‘बिग बॉस मराठी’मधील सहभाग, हटके विधानं आणि निवडणुकीच्या प्रचारातील त्यांची अनोखी शैली यामुळे त्यांना राज्यभर ओळख मिळाली. मात्र, एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी आणि मतदारांचा विश्वास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्यांच्या निवडणूक निकालांतून वारंवार दिसून आलंय. 2025 मध्ये सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना सुमारे 2,772 मतं मिळाली होती. त्यानंतर 2026 च्या पुणे शिक्षक मतदारसंघात केवळ 19 मतांवर त्यांची गाडी अडली. अर्थात, सातारा नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यांची मतदाररचना वेगळी आहे. शिक्षक मतदारसंघात पात्र शिक्षक मतदारच मतदान करतात. त्यामुळे दोन्ही निवडणुकांतील मतांची तुलना या वेगवेगळ्या बाबी आहेत.

पण, निवडणूक कोणतीही असो बिचुकलेंची लढवण्याची जिद्द, प्रसिद्धीसाठी वेगळी शैली आणि सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देणारी भाषा या गोष्टी बिचुकले यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा भाग बनल्या आहेत. पण लोकशाहीत शेवटी उमेदवाराच्या घोषणांपेक्षा मतदारांचा कौल महत्त्वाचा असतो. जे पुणे शिक्षक निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून, ‘मैं खड़ा तो सरकार से बड़ा’ म्हणणाऱ्या बिचुकलेंना यावेळी मतपेटीतून मिळालेलं उत्तर मात्र अवघ्या 19 मतांचं आहे. आता पराभव तर झालाय पण, बिचुकले या पराभवाचं उत्तर त्यांच्या स्टाईलने कसं देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

follow us