वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर मराठा समाज आक्रमक, ‘हुंडा’ घेणाऱ्यांना शिकवणार धडा; समिती होणार स्थापन

Vaishnavi Hagawane Case : सासरच्या लोकांकडून होणारा छळ आणि सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यानंतर मराठा समाजातील काही प्रमुख नेत्यांची सोमवारी पुण्यात बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिरोळे म्हणाले, वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे सबंध देशात खळबळ उडाली. पुण्यातील मराठा समाज देखील खडबडून जागा झाला आहे. लग्नकार्यामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती प्रथा सुरू आहेत त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये समाजातील प्रतिष्ठित लोकांना घेऊन या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत शहरातील मातब्बर मंडळी असतील ज्यांच्या शब्दाला समाजात मान आहे. या समितीच्या माध्यमातून अनिष्ट प्रथांमुळे होणाऱ्या छळाला कसे सामोरे जाता येईल, या त्रासाला कशा पद्धतीने पायबंद घालता येईल याबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे शिरोळे यांनी सांगितले.
अरविंद शिंदे म्हणाले, या बैठकीमध्ये अनेकांनी मुलीचा किंवा मुलाचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करायचा निर्णय घेतला. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती जर एखाद्या घरात झाली तर त्यांच्यासोबत कोणताही रोटीबेटीचा व्यवहार होणार नाही. त्यांच्या घरातील मुलगी घेतली जाणार नाही किंवा त्यांच्या घरात लग्न करून मुलगी दिलीही जाणार नाही, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे.
तुमच्या घरात जी सून म्हणून मुलगी आली तिचा छळ झाला तर तो समाज सहन करणार नाही. त्यासोबतच वेळेत लग्न लावणे, कमी लोकांमध्ये लग्न करणे, श्रीमंतांच्या लग्नाचं अनुकरण मध्यमवर्गीय कुटुंबांनी न करणं याबाबत ठराव घेण्यात आले. हे ठराव आता मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं अरविंद शिंदे यांनी सांगितलं.
यापुढे आम्ही कोणत्याही मराठा समाजातील कुटुंबाच्या लग्नात गेलो तर आमच्या हस्ते कोणालाही गाडीची चावी, सोन्याची चेन अथवा अंगठी देणार नाही. तसेच नवरदेवाच्या वडिलांनी अशा प्रकारच्या मागणी करू नये आणि तसं समाजाला आढळल्यास या त्यांना घरी जाऊन समज देऊ असे देखील शिंदे म्हणाले. चेतन तुपे म्हणाले, पुढील काळामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीने हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात आला अशा प्रवृत्तींवर बहिष्कार टाकण्यात येईल. या माध्यमातून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना सहन केलं जाणार नाही अशा प्रकारचा मेसेज देण्यात येईल.
वैष्णवी हगवणे प्रकरणात CID चौकशी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा