‘महिलांनी स्वतंत्र राहू नये, हा मनुस्मृतीचा डाव’; पुण्यात राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी यांनी आपण आज राजकारणावर बोलणार नसल्याचे स्पष्ट करत तरुणाई, महिला आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 08 22T195352.214

Rahul Gandhi launches a scathing attack in Pune : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त सुरुवात झाली असून, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात तरुणींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण आज राजकारणावर बोलणार नसल्याचे स्पष्ट करत तरुणाई, महिला आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपले विचार मांडले.

‘पिंजरा तोडा’ ही या कार्यक्रमाची संकल्पना असून, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आणि विशेष असते, असा संदेश राहुल गांधी यांनी यावेळी दिला. भारतातील तरुणांची मोठी लोकसंख्या हीच देशाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी आपल्या क्षमता ओळखून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

महिलांच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी समाजाने महिलांना ठराविक चौकटीत बंदिस्त केल्याचे मत व्यक्त केले. महिला म्हणजे केवळ पत्नी, आई किंवा बहीण एवढीच त्यांची ओळख नाही. त्या बुद्धिमान आहेत, व्यावसायिक आहेत, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत, तसेच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आहेत. महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने झाली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

‘रामरक्षा’ आंदोलनादरम्यान गोंधळ आणि राऊतांची आक्रमक भाषणे; मोरगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, आज महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, क्रीडा, विज्ञान, कला आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र, एवढी मोठी प्रगती करून देखील महिलांना आजही समाजातील काही ठराविक चौकटींमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांनी स्वतःचे निर्णय घेऊ नयेत आणि त्या कायम कोणाच्या तरी नियंत्रणाखाली राहाव्यात, अशी मानसिकता अजूनही समाजात असल्याची टीका त्यांनी केली.

महिलांच्या स्वातंत्र्यावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा संदर्भ दिला. महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये, अशी मानसिकता या विचारसरणीत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, तुम्ही कोणालाही बांधील नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. कोणत्याही पुरुषाचा तुमच्यावर अधिकार नाही. तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाही.

महिलांनी स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असून, त्याच्या आयुष्याचा मार्ग ठरवण्याचा अधिकार देखील त्यांचाच असायला हवा, असा संदेश राहुल गांधी यांनी दिला. महिलांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी उपस्थित महिलांना थेट संवाद साधण्याची संधी दिली. त्यांनी महिलांना व्यासपीठावर येऊन आपले अनुभव आणि मत मांडण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेक महिलांनी व्यासपीठावर येत महिलांच्या अधिकारांबाबत आपली मते मांडली. महिलांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, सामाजिक दबाव आणि भेदभावाचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.

Rahul Gandhi : ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल; विमानतळावर स्वागत

काही महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपल्याला कमी लेखले जात असल्याचा अनुभव व्यक्त केला. महिला कितीही शिकलेली किंवा सक्षम असली तरी तिच्या निर्णयांवर पुरुषांकडून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रातही मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जात असल्याचे अनुभव यावेळी मांडण्यात आले.

महिलेची शैक्षणिक पात्रता किंवा पदवी मोठी असली तरी अनेकदा पुरुषाची पदवी आणि कर्तृत्व अधिक महत्वाचे मानले जाते, अशी खंत देखील महिलांनी व्यक्त केली. घरातील निर्णयापासून ते शिक्षण, नोकरी आणि करिअरच्या निवडीपर्यंत महिलांना अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनीही शिक्षणाच्या क्षेत्रातील भेदभावावर भाष्य केले. मुलींना शिक्षणाची समान संधी मिळणे आवश्यक असून, मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, असे त्यांनी सांगितले. महिलांना समान संधी, समान सन्मान आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर त्या देशाच्या विकासात आणखी मोठे योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यातील या कार्क्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुणी सहभागी झाल्याने छात्रों की गुंज कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. राजकारणापेक्षा तरुणांचे प्रश्न, महिलांचे स्वातंत्र्य, समानता आणि स्वतःची ओळख या विषयांवर राहुल गांधी यांनी संवाद साधल्याने कार्यक्रमाचा केंद्रबिंदू महिलांचे अधिकार आणि तरुणाईचे स्वातंत्र्य हा ठरला.

Tags

follow us