मोठी बातमी! जैन बोर्डिंग प्रकरण गाजवणाऱ्या रविंद्र धंगेकरांना कोर्टाचं समन्स, काय आहे प्रकरण?
धंगेकर यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये कोर्टानं न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरण लावून धरंलं.
सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेमध्ये आहेत. (Pune) त्यांनी जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, हे प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे, रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर जैन बोर्डिंगचा व्यवहार देखील संबंधित बिल्डरने रद्द केला आहे. दरम्या हे प्रकरण तापलं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
रवींद्र धंगेकर यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये कोर्टानं न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. रवींद्र धंगेकरांना कोर्टात हजर होण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. समीर मदन पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर हा दावा सिव्हिल कोर्टमध्ये 27 ऑक्टोबर या तारखेपासून सुरू झाला, या पार्श्वभूमीवर हा समन्स बजावण्यात आला आहे.
रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावलं आहे, आता या खटल्याची पुढील तारीख ही दिनांक-07 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे. रवींद्र धंगेकर यांच्याकडून समीर पाटील यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या विरोधात समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा 50 कोटींची नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच बदनामीकारक विधान सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावं, वृत्तपत्रांचे संग्रह, वेबसाइट्स, सोशल मीडिया चॅनेल आणि इतर कोणत्याही ठिकाणी ते प्रसारित केले गेले आहे, त्या सर्व ठिकाणी त्यांनी माफी मागावी अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे आता रवींद्र धंकेर यांच्याकडून जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत, हे प्रकरण देखील सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणावरून आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.
