जयंत पाटलांबरोबर नेते का नाहीत? रोहित पवारांनी सांगितलं कारण
Rohit Pawar On jayant Patil ED Case : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या (ED Case) कारवाईवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे. जयंत पाटलांवर झालेल्या कारवाईबद्दल रोहित पवार म्हणाले की, एकतर जयंत पाटील यांच्यावर जी कारवाई झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातल्या (Maharashtra)कोणत्याही सामान्य माणसाला विचारलं तर त्यांचं एकच मत आहे की, कर्नाटक निकालानंतर (Karnataka Election Results)ही कारवाई होणं साहजिकच होतं. पण ही कारवाई एकावरच थांबेल का असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडलेला आहे, असल्याचे पवार म्हणाले. आज ते पुणे (Pune) दौऱ्यावर होते. यावेळी ते म्हणाले की, अशा पद्धतीचं राजकारण (Politics) हे योग्य नाही, असेही रोहित पवार म्हणाले. त्याचवेळी रोहित पवारांनी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय
रोहित पवार म्हणाले की, अशा पद्धतीनं जर दबावतंत्र आणलं जात असेल तर हे जनता स्वीकारत नाही. राजकारण हे समोरासमोर असावं, त्याचं व्यवस्थित संभाषण, जे काही तुम्ही मुद्दे आणाल आणि जे काही कराल ते तुम्हाला महाराष्ट्रासाठीच करायचंय, या मुद्द्यांवरच राजकारण झालं पाहिजे. अशा पद्धतीनं जर राजकारण होत असेल तर ते आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही. आणि हे महाराष्ट्रातील लोकं स्वीकारत नाहीत, असंही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
कारवाई ही राष्ट्रवादीच्या नेत्यावर झालेली आहे. आजचं महाराष्ट्राचं वातावरण हे भाजपच्या बाजूने आहे असं वाटत नाही, पण कारवाई झाली ही महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राबाहेर ती भाजपच्या विरोधक असलेल्या पक्षांवरच केली जात आहे, असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केला आहे. जयंत पाटील तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे लोकं घाबरतील, काही लोकांना भीती वाटेल असं मत काही लोकांचं झालं आहे.
जयंत पाटील यांच्या कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर दिसले मात्र कोणतेही नेते बाहेर रस्त्यावर दिसले नाही असा प्रश्न रोहित पवारांना पत्रकारांनी विचारला त्यावर पवार म्हणाले की, पवारसाहेबांना जेव्हा असंच एक पत्र आलं होतं तेव्हा रस्त्यावर कार्यकर्तेच होते, नेते हे फोनद्वारे संपर्कात होते, त्यामुळे अशा प्रकारचा भेदभाव करणं योग्य नसल्याचंही यावेळी पवार म्हणाले. ते म्हणाले की, आपल्या एखाद्या नेत्यावर जेव्हा कारवाई केली जाते, तेव्हा त्याचा विरोध करण्याचे वेगवेगळ्या पद्धती असतात.
कार्यकर्ते हे भावनिक असतात, ते लगेच रिअॅक्ट होत असतात. त्यांनी त्यांची रिअॅक्शन दिलेली आहे. नेते व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत असतात. त्यामुळे पवारसाहेबांच्या बाबतीत पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठिमागे होता. त्यामुळं तीथं कोणी नेते होते नव्हते, त्यामुळे जयंत पाटील यांच्याबरोबर नेते दिसले नाहीत म्हणजे त्यांचा पाठिंबा जयंत पाटील यांना नाही, अशी सरु असलेली चर्चा मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे, हे हास्यास्पद असल्याची टीका यावेळी रोहित पवार यांनी केली आहे.