अखेर शिवतारेंनी अजितदादांशी जुळवून घेतलं! तोंडभरुन कौतुक करत म्हणाले, ते तर माझे आवडीचे नेते…
Vijay Shivtare On Ajit Pawar : काल पर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 13 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे पार पडणार आहे. त्यानिमित्ताने विजय शिवतारे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांना मोठं भविष्य असल्याचे म्हटले.
शिवतारे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षात मी अजित पवारांना अनेकदा भेटलो. 2019 साली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं ऐकून मी पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार काम केले. राजकारणात काही मर्यादा असतात, त्या मी पाळल्या नाही. त्यांना याचा राग होता. त्यांनी याचं उट्ट काढायचा प्रयत्न केला. पण अजित पवार हा काम करणारा माणूस आहे. 2009 ते 2014 दरम्यान मी विरोधी पक्षात होतो. परंतु अजितदादांनी कामामध्ये कुठेही अडवणूक केली नव्हती. माझ्या प्रशासकीय इमारतीला त्यांनीच मंजुरी दिली होती. जेजुरीच्या हॉस्पिटलला त्यांनीच मंजुरी दिली होती. तसेज मी जे बोलत होतो ते सत्य झालं. अजित पवारांना त्या पक्षात राहून काहीही भविष्य नव्हतं. ते आता पक्षच घेऊन गेले.”
फोडाफोडी झाली असेल तर आता… रोहित पवारांचा फडणवीसांसह अजितदादांना खोचक सल्ला
दरम्यान, 2019 लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे व पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. तेव्हा अजित पवारांनी तु कसा आमदार होतो ते पाहतो असे जाहीर म्हटले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांनी पराभव केला होता. यानंतर आता शिवतारे पुन्हा अजित पवारांच्या जवळ आल्याचे दिसून आले आहे. शिवतारे यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन अभिनंदन केले होते.