अजित पवारांनी 3 महिन्यांपूर्वीच बोलावली होती ‘गुप्त बैठक’… इथूनच सुरु झाली राष्ट्रवादीच्या फुटीची गोष्ट

अजित पवारांनी 3 महिन्यांपूर्वीच बोलावली होती ‘गुप्त बैठक’… इथूनच सुरु झाली राष्ट्रवादीच्या फुटीची गोष्ट

महाराष्ट्रात सध्या काका-पुतण्याचा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. मागील 10 दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर अखेरीस राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. अजित पवार यांनी पूर्ण पक्षावर दावा केला आहे. तर शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्ह कुठेही जाऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. काका-पुतण्यामधील वाद आणि राष्ट्रवादीमधील ही फूट 10 दिवसांपूर्वी पडली असली तरीही त्याची सुरुवात मात्र एप्रिल महिन्यातच झाली होती. (Ajit Pawar called a ‘secret meeting’ 3 months ago. This is where the story of NCP’s split started)

11 एप्रिल 2023. शरद पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षश्रेष्ठींची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाली. पुढील योजना आखण्यात आल्या. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत राज्यातील आणि राज्याबाहेरील भाजपच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर त्याच दिवशी अजित पवार यांनी दुपारी 4 वाजता स्वतंत्रपणे दुसरी बैठक बोलावली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह काही नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्या बैठकीत या दोन मुद्द्यांवर चर्चा झाली.

ते दोन मुद्दे कोणते?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली चर्चा झाली ती म्हणजे केंद्रीय यंत्रणांची, विशेषत: ईडीची पकड कशी घट्ट बनली आहे. एक एक करून सर्वच लोक ईडीच्या कचाट्यात आले तर पक्ष चालवायला कोणी उरणार नाही, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली. आगामी दिवसांमध्ये हा ईडीचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीतील दुसरा मुद्दा होता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा. शरद पवार यांचे वय झालं आहे, त्यामुळे पक्षाला नवीन नेतृत्व मिळावं अशी चर्चा झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करून अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवावी, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी बोलून त्यांना शरद पवारांशी बोलण्यास सांगावे, असे ठरले.

सुप्रिया सुळे यांना बैठकीची माहिती देण्यात आली :

यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली आणि शरद पवार यांच्याशी बोलण्याबाबत सुचित केलं. यानंतर आपण शरद पवार यांच्याशी बोललो असून त्यांनी दोन्ही मुद्द्यांवर विचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा अवधी मागितल्याचं सुळे यांनी सांगितलं. पुढे आठवडाभरानंतर अजित पवार यांनी या नेत्यांना पुन्हा बैठकीसाठी बोलावले, मात्र यावेळी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांना दूर ठेवण्यात आले. सुप्रिया यांनी उपस्थित केलेल्या 2 मुद्द्यांवर शरद पवारांनी काय विचार केला हे अद्याप सांगितलेले नसल्याची कल्पना अजित पवार यांनी यावेळी नेत्यांना दिली. त्यामुळे आता आपण स्वतः सर्वांनी जाऊन त्यांची भेट घेऊ असेही बैठकीत ठरले.

शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला!

यानंतर सर्व 10 नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पण शरद पवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाहताच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहून टोमणा मारला आणि म्हणाले, “अरे! तुम्ही अजून इथेच आहात, मला वाटले तुम्ही आतापर्यंत गेले असणार (भाजपमध्ये गेला असणार).

राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली :

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व नेत्यांनी 11 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या घरी झालेल्या चर्चांमधील सर्व समस्या पुन्हा एकदा शरद पवार यांना ऐकवल्या. यावर शरद पवार यांनी पुन्हा थोडा वेळ मागितला. 1 मे रोजी शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी राजीनामा जाहीर करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. खरं तर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे आणि अजित यांनी महाराष्ट्राचा कारभार पाहावा, असे पक्षाच्या नेत्यांनी आधीच सुचवले होते. शरद पवारांच्या या मुद्यावर अजित पवारांनी सहमती दर्शवली.

शरद पवारांनी राजीनामा परत घेतल्यानं अजित पवार संतापले होते :

दरम्यान, शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनामा जाहीर केला. मात्र पक्षातील इतर नेत्यांनी खुल्या व्यासपीठावरून प्रसारमाध्यमांसमोर शरद पवार यांच्याकडे राजीनामा मागे घेण्याची मागणी सुरू केली. अचानक जाहीर केलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते गोंधळले होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले, असे सांगत पवारांनी नंतर आपला निर्णय मागे घेतला. या सर्व घटनांमुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी 10 बंडखोर नेत्यांची बैठक बोलावून पुन्हा चर्चा केली.

मे महिन्यातच भाजपशी बोलणी सुरू केली :

मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर मे महिन्यात अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत भाजपच्या ‘हायकमांड’शी चर्चा सुरू केली. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना देखील चर्चा पुढे नेण्यास सांगितलं. दरम्यान, शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषित केल्यावर भाजपशी बोलणी बरीच पुढे सरकली होती. दिवस सरत गेले आणि अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली. अखेर 30 जून रोजी या 10 नेत्यांची शेवटची बैठक झाली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्लॅन ठरला.

1 जुलै ठरली होती तारीख?

1 जुलै रोजीच शपथविधीची तारीख ठरली होती. मात्र त्यादिवशी समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यामुळे त्यादिवशीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना मुंबईत बोलावून घेतले. याच बैठकीत अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी सुप्रिया सुळेही आल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी राष्ट्रवादीतून बंड करून शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube