अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांची पळापळ, मृतदेह चितेजवळच पडून
मधमाशांच्या मोठ्या मोहोळाने अचानक उपस्थितांवर हल्ला चढवल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थ्यांची एकाच धावपळ उडाली.
Sudden honeybee attack during funeral rites : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्मशानभूमी परिसरातील झाडावर असलेल्या मधमाशांच्या मोठ्या मोहोळाने अचानक उपस्थितांवर हल्ला चढवल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थ्यांची एकाच धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्मशानभूमीत जमले होते. अंत्यविधेचे धार्मिक विधी सुरू असताना सर्वजण शोकाकुल वातावरणात उपस्थित होते. मात्र, याच वेळी स्मशानभूमीतील एका झाडावर असलेल्या मधमाशांच्या मुळातील मधमाशा अचानक आक्रमक झाल्या आणि त्यांनी उपस्थितांवर झुंडीने हल्ला करण्यास सुरूवात केली.
हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की, अनेकांना स्वतःचा बचाव करण्यासाठी घटनास्थळावरून जिवाच्या आकांताने पळ काढावा लागला. काहींनी जवळच्या झाडाझुडपांचा, तर काहींनी वाहनांचा आसरा घेतला. अनेक जण स्मशानभूमीपासून दूर सुरक्षित स्थळी धावत गेले. या गोंधळात अंत्यसंस्काराची प्रक्रिया तात्पुरती थांबली आणि मृतदेह काहि काळ चितेजवळच ठेवावा लागला.
पोटगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मोठे स्पष्टीकरण; व्यभिचाराचे स्पष्ट पुरावे असतील तर पोटगी नाकारता येणार
मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर मधमाशांचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच ग्रामस्थ आणि नातेवाईक पुन्हा स्मशानभूमीत परतले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची खात्री करून उर्वरित अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेत अनेकांना मधमाशांनी दंश केल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ज्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांच्या मते, स्मशानभूमी परिसरातील झाडांवर अनेक दिवसांपासून मधमाशांची मोठी मोहोळे होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थ्यांनी प्रशासनाकडे स्मशानभूमी, शाळा, सार्वजनिक उद्याने आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणांवरील धोकादायक मधमाशांच्या मोहोळांचे सर्वेक्षण करून त्यांचे तातडीने निर्मूलन करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना संबंधित विभागांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील आणि भावनिक प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे गावात दिवसभर चर्चेचा विषय निर्माण झाला होता. एका दुःखद प्रसंगात अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे उपस्थितांना मोठा मानसिक धक्का बसल्याचेही सांगितले जात आहे.