पुण्यात DJ वादाला हिंसक वळण! कॅमेऱ्यासमोर विद्यानंद बापटांना मारहाण; सुप्रिया सुळे संतापल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 03T141106.076

Supriya Sule furious : पुण्यात गणेशोत्सवातील DJच्या दणदणाटावरून सुरू असलेल्या वादाला आता गंभीर वळण मिळाले आहे. गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना TV9 मराठीशी संवाद साधत असतानाच कॅमेऱ्यासमोर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असून विविध स्तरांतून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या आवाजातील DJमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चर्चेत आहे. विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात DJवर बंदी घालण्याची मागणी करत याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर DJ समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. याच पार्श्वभूमीवर बापट TV9 मराठीशी संवाद साधत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. विद्यानंद बापट यांना मारहाण करणं ही निषेधार्ह घटना आहे. आम्ही या घटनेचा निषेध नोंदवत आहोत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक झालीच पाहिजे, असे सुळे यांनी म्हटले. केवळ हल्लेखोरावर कारवाई करून प्रकरण थांबवू नये, तर संबंधित व्यक्तीच्या मागे कोण आहे, कोणती यंत्रणा किंवा ताकद काम करत आहे का, याचाही सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

डीजे विरूद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; टिव्ही शो दरम्यान घडला प्रकार

एखादी व्यक्ती माध्यमांसमोर शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आपली भूमिका मांडत असताना तिच्यावर हल्ला होणे अत्यंत गंभीर असल्याचेही सुळे यांनी म्हटले. कोण मारतं? कशासाठी मारत आहे? हिंमत कशी होते यांची? एखादी व्यक्ती शांततेने माध्यमांशी बोलत असेल तर लोकशाहीत तो त्याचा अधिकार आहे. ही गुंडागर्दी नाही तर काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हल्लेखोराला अटक करण्याबरोबरच त्याच्या मागे कोणाची ताकद आहे का, याचाही शोध घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून सरकारवरही निशाणा साधला. पुण्यातील वाढत्या गुंडागर्दीला आळा कधी बसणार, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. भाजपने गुंडागर्दी कधी कमी होणार हे सांगितलं पाहिजे. सत्तेत ते आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. एक व्यक्ती लोकशाही पद्धतीने बोलत असेल तर त्याला मारलं जातं आहे. हे सहन होणारं नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत सुळे यांनी मुख्यमंत्री यांच्याशीही याबाबत संपर्क साधणार असल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीला मारण्याची हिंमत कशी होते? पाठीमागे मोठी ताकद असल्याशिवाय हे कोण करेल? महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राची बदनामी होतेय. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आवरा हे गुंड, असे आवाहन त्यांनी केले.

“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…” विद्यानंद बापटांचा श्लोक व्हायरल; त्यांनीच सांगितला श्लोकचा अर्थ

गणेशोत्सवातील DJ, त्यातून होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यावर झालेली मारहाण यामुळे पुण्यातील हा वाद आता केवळ DJच्या वापरापुरता मर्यादित राहिलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या आक्रमकतेचाही मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस काय कारवाई करतात, या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us