live now
Maratha Protest : सरकारच्या शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला, विखेही उपोषणस्थळी
Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.
Manoj Jarange Protest for maratha Reservation sixth day of hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सरकारकडून वारंवार त्यांच्याशी चर्चा त्यामुळे आता सरकारकडून प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होते का आणि त्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतात का, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात आतापर्यंत या आंदोलनामध्ये नेमकं काय-काय घडलं? तसेच आज काय घडणार? जाणून घ्या सविस्तर…
LIVE NEWS & UPDATES
-
सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला
मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला
-
अभ्यासक निरोप घेऊन जरांगेंकडे
मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांबरोबर चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवलीत दाखल झाले होते. या शिष्टमंडळाचा मसुदा घेऊन मराठा अभ्यासक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. परंतु अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.
-
मराठ्यांनाच किंमत द्या, त्यांनाच मोठं करा; घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना जरांगेंचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. दुसरीकडे आंदोलनस्थळी जरांगेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी सुरू आहे. त्यात जरागेंना तरूण आंदोलकांना आवाहन केले की, मद्यपींपासून सावध राहा त्यांना पोलीसांच्या ताब्यात द्या तसेच फक्त मराठ्यांना किंमत द्या त्यांनाच मोठं करा.
-
बैठकीत एकमत झाल्यास सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारख यांच्या शेतातील निवासस्थानी सामंत आणि प्रसाद लाड पोहोचले असून, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत त्यांची बैठक सुरू आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलकांच्या मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा केली जात आहे.या बैठकीत एकमत झाल्यानंतर राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
सरकारच्या शिष्टमंडळ अन् अभ्यासक आंतरवालीत दाखल; सरपंचांच्या घरी चर्चा सुरू...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ आणि अभ्यासक आंतरवालीत आले आहेत. त्यावर आता आंतरवालीतील सरपंचाच्या घरी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता तरी जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का? तसेच ते उपोषण मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत येणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मराठा बांधव (Maratha Protester) अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. त्यांनंतर आज थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत येणार. त्यामुळे आता तरी जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का? तसेच ते उपोषण मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
जालना जिल्हा बंदची हाक मागे आणि रस्ता रोको स्थगित
मागण्यांचा जीआर दोन दिवसात निघला नाही तर पुन्हा हाक देण्यात येणार आहे. जरांगे पाटील समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी दिली माहिती सरकारने 5 दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने हाक दिली होती. मात्र काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचा मसुदा वाचून दाखविला. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटलांनी पाणी त्याचबरोबर सलाईन घेतल्यामुळे आजचा रास्ता रोको आणि जालना जिल्हा बंदची हाक मागे घेण्यात आली आहे.
-
मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या अनेक भागातून मराठा बांधव (Maratha Protester) अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मात्र या आंदोलनादरम्यान दशरथ रायकर (Dashrath Raikar) या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीतच मृत्यू झाला.
दशरथ रायकर हे मराठा आंदोलक बीड (Beed) जिल्ह्यातील संगम येथील राहिवासी आहेत. जरांगेंनी मराठा बांधवांना आंदोलनासाठी अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक मराठा आंदोलकांप्रमाणेच दशरथ रायकर हेही जरांगेंना पाठींबा देण्यासाठी अंतरवाली सराटीला गेले. काल रात्री उशीरा ते अंतरवालीतील एका शेतात झोपले हाते. परंतू सकाळी बराच वेळ झाला तरी ते झोपेतून उठलेच नाहीत. त्यांची प्रकृती पाहता तेथील उपस्थित मराठा बांधवांनी त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
-
जरांगेचा राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम
जरांगे पाटील यांनी सरकारसमोर आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी, सरकारच्या वतीने भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारच्या वतीने महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली. त्यांच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली. मात्र, प्रत्यक्ष प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली.
-
भाषेवरून जरांगे पाटलांना विनोद पाटलांचा सल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा (Jarange) वारसा सांगणाऱ्या मराठा समाजाने महिलांचा सन्मान राखला पाहिजे, अशी भूमिका मराठा आरक्षण अभ्यासक विनोद पाटील यांनी मांडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असून, त्यांच्या वक्तव्यांमधील भाषेवरून पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मानाने परतावा करणारी परंपरा आपली असल्याचे सांगत चुकीची भाषा वापरली गेली असेल तर ती चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
-
मागणीप्रमाणे मसुदा दिलाय, मंत्री विखे पाटील यांनी आकडेवारीच मांडली
शासनाच्या वतीने काल जिल्हाधिकाऱ्यांनी (Jarange) सरकारचा मसुदा मांडला मनोज जरांगे पाटील यांच्याकडं मांडला आहे. 58 लाख नोंदीचा जो काही मुद्दा आहे, त्यामध्ये न्यायमुर्ती शिंदे समितीनंतर यांनी नोंदींची पूर्ण कारवाई व्हावी अशी सरकारची अपेक्षा आहे. दरम्यान, या समितीपूर्वी एक हजारसुद्धा प्रमाणपत्र मिळाले नव्हते. पण शिंदे समितीनंतर मराठवाड्यात सुमारे साडेतीन लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे, असा दावा भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर बीड (Beed) आणि जालना (Jalana) जिल्ह्यात मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. जिल्ह्यातील महामार्गांवर विविध ठिकाणी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथे मध्यरात्री मराठा बांधवांनी जालना-जळगाव महामार्गावर टायर पेटवून निषेध नोंदवला. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांनी आज (3 सप्टेंबर) जालना जिल्हा बंदची हाक दिली होती.
-
मराठा आरक्षणाच्या मसुद्यात ‘त्रुटी असतील तर सांगा, दुरुस्त करू- विखे पाटील
जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आंदोलकांमधील चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करणारा मसुदा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला असून, या मसुद्यात काही त्रुटी किंवा उणीवा वाटत असल्यास त्या सांगाव्यात, आवश्यक बदल करून अंतिम प्रस्ताव तयार करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली.
-
जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांचा प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू हे उपोषण स्थळी जरांगेंच्या भेटीला गेले होते. मात्र यावेळी जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषण सोडण्याचा प्रस्ताव फेटाळल्याने जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षकांना रिकाम्यान हाताने परतव लागलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जरांगे पाटलांशी बोलताना म्हटले की, आम्हाला आपली खुप काळजी आहे म्हणून इथे आलो आहे. जे शिबिर लावतात, त्यात जास्तीत जास्त प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य आहे ते आपण करत आहोत. सरकार सराकात्मक आहे.
-
माजी आमदार शहाजी बापू जरांगेंच्या भेटीला
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी 1 सप्टेंबरला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जरांगेंच्या भेटीला गेले होते. जरांगेंची प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांचे डोळे पाणावले होते. तसेच त्यावेळी त्यांनी तेथून थेट मंत्री शंभूराज देसाई यांना फोन केला. त्यांनी आंतरवालीतील परिस्थिती देसाई यांना सांगितली. त्यानंतर त्यांना उपस्थितांना बोलताना म्हटलं की, जे कोणी आमचे कुणबी दाखल अडवत आहे त्यांना सद्बुद्धी द्या. असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी संबोधित केलं.
-
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली; उपचारही नाकारले
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. 29 ऑगस्टला ते उपोषणाला बसलेले आहे. मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. जरांगे यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. ते पाणीही घेत नाहीत. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उलट्यांचा त्रास होत होता. डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. परंतु जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पथकाला तपासणी न करताच परत जावे लागले. त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली गेली.
-
‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई आंदोलनाची तयारी सुरू केली असून मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. सरकारकडून अद्याप आपल्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नसल्याचा दावाही जरांगे यांनी केला.आजपासून मुंबईत जायला सुरुवात करा. पुढचे 12 दिवस हळूहळू मुंबईत जा. सगळ्यांनी एकाच वेळी जाणे शक्य नाही. मी देखील हळूहळू मुंबईत येतो. मी मुंबईत आल्यानंतर तुम्ही बाहेर पडा. तोपर्यंत मित्र, नातेवाईक आणि पाहुण्यांकडे राहा. आझाद मैदानावर जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. गणपती पाहण्यासाठी किंवा मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी जाता येईल, मात्र आंदोलनाच्या ठिकाणी आताच गर्दी करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-
जरांगेंचं आंदोलन; फडणवीस म्हणाले, चर्चेची दारे खुली
अंतरवाली सराटीतील आंदोलनाची धार वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितलं की, आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने चर्चेतून मार्ग काढला आहे आणि यापुढंही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकारने चर्चेची भूमिका कायम ठेवली आहे. ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत, संविधानानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन न करणाऱ्या असतील, त्यावर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
-
परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा
परभणीत खासदार संजय जाधव यांनी (Jarange) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला गालबोट लागलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा मेळावा रद्द करण्याची विनंती जाधव यांच्याकडे केली होती. मेळावा रद्द केला नाही तर आपण स्वतः तिथे येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिला होता. मात्र जाधव यांनी कार्यक्रम रद्द न करण्याची भूमिका घेतल्याने अखेर मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि काही जणांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.
-
“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!
परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करण्यास खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द न करण्याचा निर्णय घेऊन बंडू जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक केली असल्याचा दावा जरांगे यांनी केला. रविवारी अंतरवाली सराटी (Antarvali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बंडू जाधव यांच्यासह एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला.
-
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम
जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर खासदार संजय जाधव यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली, कार्यक्रम रद्द होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. या नियोजित कार्यक्रमाची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज झाली असून मोठ्या संख्येने नागरिकही कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले. जरांगे पाटील यांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार असल्याचे जाधव यांनी म्हटले. तसेच त्यांच्या भावना आपल्याला मान्य असून, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत आपल्या भावना वेगळ्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-
‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!
मनोज जरांगे यांनी परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. याच मागणीसाठी त्यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना फोन करून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली. हा कार्यक्रम झाला तर आपण उपोषण सोडून थेट परभणीत दाखल होऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.
-
जरांगेंना पोलिसांची नोटीस; आंदोलन करायचं असेल तर ‘या’ 10 अटींचं पालन करा
आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे शनिवारपासून (29 ऑगस्ट) अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात BNSS कलम 168 अंतर्गत ही नोटीस दिली होती. आंदोलन शांततेत पार पडावे आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी मनोज जरांगेंना काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या.
-
मराठा आंदोलकांकडून थेट मंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग; सोलापुरात गोंधळ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटले. सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला आहे. धावत्या गाडीमागे पळत जाऊन बापू गायकवाड या आंदोलकाने बाबासाहेब पाटील यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या आंदोलकगाने दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकाला गाडीखालून ओढत बाहेर काढले. आंदोलकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला.
-
29 ऑगस्टपासून उपोषणाला सुरूवात अन् सरकारला इशारा...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत उपस्थित राहावे असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. उपोषणाची सुरुवात झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.