पुण्यातील प्रवाशांच्या जीवांची किंमत शून्य?, पीएमपी चालकाचा चित्रपट पाहत वाहन चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
पुण्यातील प्रवाशांच्या जीवांची किंमत शून्य?, पीएमपी चालकाचा चित्रपट पाहत वाहन चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थात पूर्णतः पीएमपीएमएलवरच अवलंबून आहे. मात्र पीएमपीएमएलच्या चालकांकडून आणि वाहकांकडून होणाऱ्या बेजाबदार पणाच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एका बस कंडक्टरने एका तरुणीचा विनयभंग केला होता. आता तर एक चालक चक्क सिनेमा पाहत गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पुणेकर प्रवाशांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे.

सिनेमा पाहत बस चालवत असतानाचा हा पीएमपीएमएल बस चालकाचा व्हिडीओ बसमधील प्रवाशाने शूट केला आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका कोणत्या मार्गावर घडला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाच्या बेजबाबदारपणाचा व्हिडीओ समोर येताच, नागरिकांकडून या चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

या व्हिडिओमध्ये चालक चक्क कानात हेडफोन घालून मोबाईल डॅशबोर्डवर ठेऊन चित्रपट पाहत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळीचा असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीएमएलच्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच बोपदेव घाटात पीएमपीएमएलची बस एका शेतातील झाडाला जाऊन धडकल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले होते. पुढे तपासात या पीएमपीएमएलचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

अवकाळी आणि संप अशा दुहेरी संकटात महाराष्ट्र; अवकाळी पावसावर विरोधी पक्ष आक्रमक 

दरम्यान, पीएमपीएमएलच्या बस मधून दररोज 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत असतात. यात पीएमपीएमएलचे चालक, वाहक आणि प्रवासी यांच्यातील वाद काही नवे नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून खासगी वाहन चालक आणि पीएमपीएमएलचे चालक यांच्यातील वादाचे प्रमाण अधिक वाढले आहेत. यात पीएमपीएमएलने खासगी वाहनांना धडक देण्याचे प्रकार वाढल्याने प्रामुख्याने हे वाद होत असल्याचे आढळून आले आहे.

पीएमपीएमएलचे चालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. सिग्नल तोडणे, फोनवर बोलत वाहन चालवणे, अतिवेगात वाहन चालवणे हे या चालकांचे नित्याचेच झाले आहे. यांच्यावर ना पीएमपीएमएल प्रशासन काही कारवाई करते ना वाहतूक पोलीस, यामुळे या चालकांची हिम्मत आणखीच वाढली आहे. आता तर थेट प्रवाशांचा जीव टांगणीला लावून चित्रपट पाहत वाहन चालवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या चालकाचा शोध घेऊन पीएमपीएमएल प्रशासन आता तरी काही कारवाई करणार का ? हे पाहणं महत्वाचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube