Video : दुर्गेश मंगेशकर यांचा पालकांना ‘गुरुमंत्र’: क्लास जॉईन करण्यापूर्वी छोटा प्रयोग नक्की करून पहा!
Coaching Classes वर्तमानपत्रातील फुल-पेज जाहिराती, मोठमोठे होर्डिंग्स आणि आलिशान इन्फ्रास्ट्रक्चर पाहून अनेकदा पालक भुलतात.
IITPK Durgesh Mangeshkar On Coaching Classes : इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालांनंतर आता वेध लागले आहेत ते पुढील शिक्षणाचे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या हजारो कोचिंग क्लासेसपैकी नेमका कोणता क्लास निवडावा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळतो. प्रत्येक क्लासकडून ‘उत्तम निकाल’ आणि ‘अनुभवी शिक्षक’ असल्याचा दावा केला जातो. याच पार्श्वभूमीवर, IIITPK प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाचे कानमंत्र दिले आहेत.
जाहिरातींच्या चकचकाटापेक्षा ‘सत्या’वर भर द्या
आजकल कोचिंग क्लासेसनी आपला दर्जा सिद्ध करण्यासाठी ‘हाईप’ (Hype) निर्माण केली आहे. वर्तमानपत्रातील फुल-पेज जाहिराती, मोठमोठे होर्डिंग्स आणि आलिशान इन्फ्रास्ट्रक्चर पाहून अनेकदा पालक भुलतात. मात्र, केवळ लक्झरी सोयी-सुविधा म्हणजे दर्जेदार शिक्षण नव्हे. त्यामुळे ॲडमिशन घेण्यापूर्वी पालकांनी केवळ जाहिरातींवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात तिथल्या वातावरणाची पाहणी करणे गरजेचे असल्याचे प्रा. मंगेशकर यांचं ठाम मत आहे.
‘हा’ प्रयोग नक्की करून पहा
“कोणताही क्लास जॉईन करण्यापूर्वी त्या क्लासमध्ये सध्या शिकत असलेल्या किमान तीन-चार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी सविस्तर चर्चा करा. तिथले शिक्षक नक्की कसे शिकवतात? विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होते का? क्लासची पद्धत काय आहे? याचं खरं सत्य केवळ तिथले विद्यार्थीच सांगू शकतात.” असा महत्त्वाच सल्लादेखील मंगेशकर यांनी दिला आहे.
ब्रँड की फ्रँचायझी?
अनेकदा आपण एखादा क्लासेसचा ‘नॅशनल ब्रँड’ बघून तिथे प्रवेश घेतो. मात्र, अनेक मोठे ब्रँड्स आपल्या शाखा फ्रँचायझी (Franchise) तत्त्वावर चालवतात. अशा वेळी मुख्य शाखेचा निकाल पाहून फ्रँचायझी असलेल्या शाखेत प्रवेश घेणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे तुम्ही ज्या शाखेत प्रवेश घेत आहात, ती त्यांची स्वतःची आहे की फ्रँचायझी? यासोबत राष्ट्रीय स्तरावरील निकालापेक्षा त्या विशिष्ट स्थानिक शाखेचा निकाल काय आहे, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरतं असं मंगेशकर यांनी सांगितलं.
