क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाला. अपघातांनंतर जखमी झालेल्या ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता. त्याची कार नरसन शहराजवळ आल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि रेलिंग आणि खांब तोडून कार उलटली. यानंतर त्याच्या कारला आग लागली. तोपर्यंत गावकरी आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

अपघाताची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. घाईगडबडीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्याला डेहराडूनला स्थलांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता.

अपघाताची माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या डोक्यावर आणि पायाला दुखापत झाली आहे. डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube