U19 Asia Cup 2026 : भारताची अफगाणिस्तानवर मात; फायनलमध्ये पाकशी भिडणार !
IND U19 vs AFG U19: अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सनी पराभव केला. आर्यवीर सहवाग, लक्ष्य रायचंदानी आणि विनीतच्या शानदार फलंदाजीने भारत फायनलमध्ये पोहोचला.
U19 Asia Cup 2026 : भारतीय अंडर-19 संघाने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवत अंडर-19 आशिया कप 2026 (U19 Asia Cup 2026) च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ओमानमधील अल अमरात क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत 37 व्या षटकातच 2 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (PAK) होणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे 14 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा इरादा भारतीय संघाचा आहे.
60 एकरात मंडप, 4 लाख पाहुणे, डिफेंडर अन् बरंच काही….’बाहुबली’च्या मुलीचा शाही लग्नसोहळा!
आर्यवीर सहवागसह टॉप-3 फलंदाजांची अर्धशतके
भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर आर्यवीर सहवाग, कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्ही. के. विनीत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. आर्यवीर सहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांनी पहिल्या विकेटसाठी 102 चेंडूंमध्ये 117 धावांची शानदार भागीदारी केली. आर्यवीरने 56 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.
कर्णधार लक्ष्य रायचंदानी शतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला. त्याने 90 चेंडूंमध्ये 93 धावांची शानदार खेळी केली. तर व्ही. के. विनीतने 62 चेंडूंमध्ये 57 धावांची नाबाद खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. यशवर्धन चौहान 16 धावांवर नाबाद राहिला आहे.
भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला रोखले
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या अफगाणिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर अब्दुल्ला नदरजान 14 धावांवर, तर फरीदुल्लाह एहसान 13 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुभान जखैलने 31 धावा केल्या. विकेटकीपर नोमान सलरजई आणि शाह फैसल रहीमी यांनी प्रत्येकी 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. अफगाणिस्तानचा कर्णधार सोहैल खानने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद 36 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 227 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून ईशान सूदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आर्यन सवसानीने 2 विकेट्स मिळवत अफगाणिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान महामुकाबला
अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 14 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय युवा संघाला मिळणार आहे. त्यामुळे या महामुकाबल्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.