यशस्वीचा शतकी तडाखा; भारताने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला !
Yashasvi Jaiswal- दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वाल मात्र अखेरपर्यंत ठाम उभा राहिला. त्याने शानदार शतक झळकावत भारताला सहज विजय मिळवून दिला.
India beat Afghanistan by nine wickets : भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवत मालिका 3-0 अशी जिंकलीय. प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीनंतर रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे भारताने 219 धावांचे लक्ष्य अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात सहज गाठले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सुरुवातीलाच अफगाणिस्तानच्या अव्वल फलंदाजांना माघारी धाडत मोठे धक्के दिले आहेत. रहमानुल्लाह गुरबाज (5), इब्राहिम झद्रान (11) आणि रहमत शाह (5) हे तिघेही स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेल देत बाद झाले. त्यानंतर दारविश रसूली (1) यालाही प्रसिद्धने बाद करत पहिल्या दहा षटकांतच चार बळी घेतले.
शाहिदी-उमरजई यांनी डाव सावरला
36 धावांत चार विकेट गमावल्यानंतर अफगाणिस्तान संघ संकटात सापडला होता. मात्र कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह उमरजई यांनी संयमी भागीदारी करत संघाला सावरले. शाहिदीने शांतपणे डाव उभारत 64 चेंडूत अर्धशतक पूर्ण झळकविले. तर उमरजईने आक्रमक खेळी करत 55 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. दोघांनी भारतीय गोलंदाजांवर काही आकर्षक फटकेही लगावले. उमरजई अखेर प्रिन्स यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसऱ्या बाजूने पायात गोळे येत असूनही शाहिदीने संयम राखत 128 चेंडूत आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक पूर्ण केले.
अफगाणिस्तान 218 धावांत आटोपला
शाहिदीच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने 218 धावा उभारल्या. प्रसिद्ध कृष्णाने अखेर शाहिदीची विकेट घेत पाचवा बळी मिळवला. शाहिदीने डीप मिडविकेटवर श्रेयस अय्यरकडे झेल दिला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने पाच विकेट घेत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली.
रोहित-यशस्वीची धडाकेबाज सलामी
219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवाल यांनी सुरुवातीपासूनच अफगाण गोलंदाजांवर तुटून पडत वेगवान धावा केल्या. रोहितला एकदा जीवदान मिळाले, मात्र त्यानंतर त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. यशस्वी जैस्वालने अवघ्या 38 चेंडूत अर्धशतक झळकावले. तर रोहित शर्माने 47 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाचा भक्कम पाया घातला. रोहित शर्मा 69 चेंडूत 79 धावा करून मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या खेळीत आकर्षक चौकार आणि षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वाल मात्र अखेरपर्यंत ठाम उभा राहिला. त्याने शानदार शतक झळकावत भारताला सहज विजय मिळवून दिला.