शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी अखेर मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब शिवराज राक्षे यानं आपल्या नावावर केलाय. पुण्यातील मामासाहेब मोहोळ मैदानावर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे. अंतिम सामन्यात शिवराजनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच थेट चितपट कुस्ती करुन विजय मिळवलाय.
पुण्यातील मामासाहेब मोहळ मैदानावर आज 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या फायनलचा थरार पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अनेक चुरशीच्या लढती आतापर्यंत पाहायला मिळाल्या.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही मल्लांनी पुण्याच्या तालमीतच कुस्तीचे धडे घेतले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवलेत. त्यामुळं वस्ताद काका पवार यांच्या शिष्यानं यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय.
आज झालेली अंतिम लढत देखील अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या स्पर्धेचा आज अखेर महाराष्ट्र केसरीचा मानकरी मिळाला आहे. ही मानाची गदा कोण जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
माती विभागातून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सेमीफायनलची कुस्ती झाली. माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली आहे. महेंद्र यांनी सिकंदरवर मात करत सेमीफायनल जिंकली. तर मॅटवरील सेमीफायनल लढतीमध्ये हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शिवराज राक्षे अशी लढत पाहायला मिळाली, त्यामध्ये शिवराज राक्षे यानं हर्षवर्धन सदगीरवर विजय मिळवला.
आज सायंकाळी माती आणि मॅट विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात आल्या. यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत झाली. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागातील शिवराज राक्षे यांच्यात फायनल स्पर्धा झाली त्यात शिवराज राक्षेनं बाजी मारली.