ODI World Cup 2023 : बाबर आझम चिडला! ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 18 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे 367 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पाकिस्तानने चांगली सुरूवात करून देखील या सामन्यात केवळ 305 च धावा करू शकला. त्यामुळे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानला दुसरा पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच चिडला.
या सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाबर आझम म्हणाला की आम्हाला हवी तशी गोलंदाजी करता आली नाही. आम्ही डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजाचा झेल सोडला. त्याच्यासारख्या फलंदाजाला जीवदान दिलं तर तो सोडणार नाही. हे मैदान धावा करण्यासाठी योग्य होतं. इथे चूक व्हायलाच नको होती. आम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची होती. मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्हाला भागीदारी करता आली नाही. सामन्यातील मधल्या ज्या ओव्हर्स असतात तिथे संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही.
Aus VS Pak : कांगारूंनीही पाकला धुतलं; 62 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानी झेप
विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सुरूवातीचे सामने हरल्यानंतर सलग दुसरा विजय विजय मिळवला. तर पाकिस्तानला सुरुवातीला दोन विजय मिळाल्यानंतर सलग दोन पराभवाला सामोरे जावं लागलं. आझमच्या मते डेव्हिड वॉर्नरचा झेल ज्या खेळाडूने सोडला तेथेच मॅचचा खरा टर्निंग पॉइंट होता.
सामन्यात सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत डेविड वॉर्नर (163) आणि मिचेल मार्श (121) या शतकी खेळींनंतर गोलंदाजांच्या जोरावर पाकला पराभूत केलं. एम. चिन्नास्वामी स्टेडिअम या छोट्या ग्राऊंडवर पाकिस्तानने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करायला दिली. त्यानंतर वॉर्नर आणि मार्शच्या भागीदारीने 203 चेंडूत 259 धावा केल्या. या जोरदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे नऊ विकेटमध्ये 367 धावांचा डोंगर उभा केला होता. तर पाकिस्तानने चांगली सुरूवात करूनही 45.3 ओवरमध्ये 305 च धावा केल्या. त्यामुळे त्यांना धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा मोठा फायदा
पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा फायदा झाला आहे. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने मोठी झेप घेत थेट चौथा क्रमांक मिळवला आहे. पाकिस्तानला मात्र मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयी मार्गावर आगमन केले आहे. तर पाकिस्तानचा पराभवाच्या मार्गाने प्रवास सुरू झाला आहे. पराभवाची मालिका खंडीत करायची असेल तर पाकिस्तानला आता मोठे विजय मिळवण्याची गरज आहे. मात्र पुढील सामने बलाढ्य संघांबरोबर होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची वाट अधिकच कठीण झाली आहे.