रोनाल्डोचा ऐतिहासिक पेनल्टी गोल; चाळीशीनंतर विश्वचषक नॉकआऊटमध्ये गोल करणारा पहिलाच खेळाडू
रोनाल्डो याने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करत जागतिक फुटबॉलमधील आपले स्थान किती अढळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
Ronaldo becomes the first player to score a goal in the knockout stage : फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेत पोर्तुगालच्या महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करत जागतिक फुटबॉलमधील आपले स्थान किती अढळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. क्रोएशियाविरोधात राउंड ऑफ 32 सामन्यात निर्णायक गोल करत रोनाल्डो विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत 40 वर्षांनंतर गोल करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला. या कामगिरीमुळे त्याच्या नावावर आणखी केला सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे.
टोरांटो येथे खेळल्या गेलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात क्रोएशियाने सुरुवातीला आघाडी घेत पोर्तुगालवर दबाव निर्माण केला होता. पहिल्या सत्रापासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. क्रोएशियाच्या बचावफळीने रोनाल्डोला रोखून धरण्यासाठी विशेष रणनीती आखली होती. मात्र, मोठ्या सामन्यांमध्ये आपली छाप सोडण्याची सवय असलेल्या रोनाल्डोने पुन्हा एकदा निर्णायक क्षणी संघाच्या मदतीला धाव घेतली.
सामन्याच्या 67व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. संघ 0-1 अशा पिछाडीवर असताना संपूर्ण स्टेडियममधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. लाखो चाहत्यांच्या अपेक्षा रोनाल्डोवर खिळल्या होत्या. मात्र, अनुभवी रोनाल्डोने कोणताही दबाव न घेता शांतपणे पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि पोर्तुगालला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. हा गोल केवळ सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला नाही, तर फुटबॉल इतिहासातील एका नव्या विक्रमाचाही साक्षीदार ठरला.
सुनावणीत हायकोर्टाचा राजकीय टोला; तुमच्यावर गुन्हे आहेत? पक्ष बदला, तिथं वॉशिंग मशीन आहे
रोनाल्डोच्या गोलनंतर पोर्तुगालच्या खेळाडूंमध्ये नवसंजीवनी संचारली. संघाने अधिक आक्रमक खेळ करत विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले. अखेर सामन्याच्या उत्तरार्धात आणखी एक गोल करत पोर्तुगालने 2-1 असा विजय मिळवला आणि पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या विजयामध्ये रोनाल्डोच्या गोलची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
41 वर्षे आणि 147 दिवस वय असताना रोनाल्डोने हा विक्रम नोंदवला. त्यामुळे विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत गोल करणारा सर्वात वयस्क खेळाडू म्हणून त्याचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. यापूर्वी कोणत्याही फुटबॉलपटूला 40 वर्षांनंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करता आलेला नव्हता. त्यामुळे रोनाल्डोची ही कामगिरी केवळ विक्रम नसून फुटबॉलमधील दीर्घायुष्य, फिटनेस आणि सातत्य यांचे सर्वोत्तम उदाहरण मानली जात आहे.
विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या इतिहासात अनेक विक्रम आपल्या नावावर असलेल्या रोनाल्डोसाठी हा नॉकआऊट फेरीतील पहिलाच गोल ठरला. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणाऱ्या रोनाल्डोने अनेक विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. गट फेरीत त्याने अनेक महत्त्वाचे गोल केले असले तरी बाद फेरीत गोल करण्याची प्रतीक्षा अखेर 2026 च्या विश्वचषकात संपली.
रोनाल्डोने मोडलेला विक्रमही पोर्तुगालच्याच एका दिग्गज खेळाडूच्या नावावर होता. माजी बचावपटू पेप यांनी फिफा विश्वचषक 2022 मध्ये स्वित्झर्लंडविरुद्धच्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात 39 वर्षे आणि 283 दिवस वय असताना गोल केला होता. त्या वेळी पेपे यांनी विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीतील सर्वात वयस्क गोलस्कोररचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, चार वर्षांनंतर त्यांचाच सहकारी आणि पोर्तुगालचा सर्वकालीन महान खेळाडू मानल्या जाणाऱ्या रोनाल्डोने तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला.
रोनाल्डोचा ऐतिहासिक पेनल्टी गोल; 40 नंतर विश्वचषक नॉकआऊटमध्ये गोल करणारा पहिलाच खेळाडू
रोनाल्डोच्या या कामगिरीनंतर जगभरातील फुटबॉल चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक माध्यमांवर त्याचा पेनल्टी गोल, त्यानंतरची जल्लोषपूर्ण प्रतिक्रिया आणि विक्रमाची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेक माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ज्ञांनीही रोनाल्डोच्या फिटनेसचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले आहे.
वयाच्या 41व्या वर्षीही सर्वोच्च स्तरावरील स्पर्धेत निर्णायक भूमिका बजावणारा रोनाल्डो आजच्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. शिस्तबद्ध जीवनशैली, कठोर प्रशिक्षण, व्यावसायिक दृष्टिकोन आणि जिंकण्याची अमर्याद भूक याच्या जोरावर त्याने आपल्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ अविश्वसनीयरीत्या लांबवला आहे. त्यामुळेच जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी रोनाल्डो हा केवळ एक खेळाडू नसून जिद्द, मेहनत आणि उत्कृष्टतेचे प्रतीक बनला आहे.
क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यातील हा गोल आणि त्यातून झालेला विश्वविक्रम हे आणखी एक उदाहरण आहे की, विक्रम मोडण्यासाठी आणि इतिहास घडवण्यासाठी रोनाल्डोचे नाव आजही तितकेच प्रभावी आहे. फुटबॉलच्या सर्वात मोठ्या रंगमंचावर त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की महान खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर नव्हे, तर इतिहासाच्या शिखरावर उभे राहून आपली ओळख निर्माण करतात.