कपिल देवचे व्हिजन, गांगुलचे अॅग्रेशन अन् धोनीचा संयम : कर्णधार म्हणजे काय रोहितने दाखवून दिले!
अहमदाबाद : मागील जवळपास दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना आज (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जगातील चाहते या सामन्यांकडे डोळे लावून बसले आहेत. विशेष म्हणजे या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. (World Cup 2023 Rohit Sharma showed his captaincy skills to lead India to the final)
सलग 10 विजयांसह भारताची अंतिम सामन्यात धडक :
अंतिम फेरीपर्यंतच्या या प्रवासात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकत टीम इंडिया अजिंक्य आहे. याशिवाय भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, तर मोहम्मद शमी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. श्रेयस अय्यरनेही सलग दोन शतके झळकावली आहेत तर केएल राहुलने गंभीर प्रसंगी उत्कृष्ट खेळी केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे.
पण टीम इंडियाच्या या अप्रतिम प्रवासात ज्या खेळाडूने सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. कर्णधारपदासोबतच रोहितने बॅटनेही मन जिंकणारी कामगिरी केली आहे. सलामीवीर रोहितने संपूर्ण स्पर्धेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघाची धावगती सुरुवातीपासूनच चांगली राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे रोहितनंतर येणाऱ्या इतर फलंदाजांवर वेगाने धावा काढण्याचे फारसे दडपण येत नाही. परिणामी भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरत आहे.
Ind vs Aus: टीम इंडिया समोर ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान; ‘ही’ आहेत ऑस्ट्रेलियन संघाची बलस्थान
रोहितच्या आधी कपिल देव, सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठू शकला होता. कपिल (1983) आणि धोनी (2011) यांनी भारताला चॅम्पियन बनवले होते. तर गांगुलीच्या सेनेला 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहितच्या नेतृत्वात भारत चौथ्यांचा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्व कौशल्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गतवर्षी टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाचे मनोधैर्य चांगलेच खचले होते. स्वतः रोहितही निराश झाला होता. त्यानंतर रोहित शर्माने ठरवून संघाच्या मानसिकतेत आणि प्रत्यक्ष मैदानावरील रणनीतीमध्ये काही बदल घडवून आणले. संघाला आयसीसी स्पर्धा जिंकायच्या असतील तर आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, हे त्याला उमगले होते. तेव्हापासून रोहितमध्ये कपिल देवची दृष्टी स्पष्टपणे दिसत होती. कपिलच्या नेतृत्वाखालीच भारताने 1983 मध्ये विश्वचषक जिंकून वेस्ट इंडिजची शान मोडीत काढली होती. त्या विश्वचषकात टीम इंडियाला कोणीही विजयाचा दावेदार मानले नव्हते.
रोहितने कर्णधार झाल्यापासूनच संघात आक्रमक वृत्ती आणली आहे. या विश्वचषकातही रोहितने सर्वांना दाखवून दिले की तो आपली आक्रमक वृत्ती कायम ठेवणार आहे. मग तो साखळी फेरीतील सामना असो वा उपांत्य फेरीतील सामना. गांगुली जेव्हा कर्णधार झाला तेव्हा त्याने संघातील वातावरण पूर्णपणे बदलून टाकले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ परदेशी भूमीवरही काही संस्मरणीय विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. नॅटवेस्ट ट्रॉफी फायनल जिंकल्यानंतर गांगुलीने लॉर्ड्सवर दाखवलेली ‘दादा’गिरी चाहते कधीही विसरू शकत नाहीत.
फायनलसाठी रोहित शर्माचा गेम प्लान तयार, प्लेईंग-11 कशी असेल?
रोहित शर्मा धोनीप्रमाणेच संयम बाळगताना आणि त्याचा सहकारी खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखवताना दिसून येत आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचे केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल दमदार फलंदाजी करत असतानाही हे चित्र पाहायला मिळाले. बुमराहच्या चेंडूवर शमीने किवी कर्णधाराचा झेल सोडल्यानंतर चाहत्यांसह रोहितचीही निराशा झाली. मात्र, त्याने संयम गमावला नाही. काही वेळाने शमीकडे बॉल दिला. त्यानंतर शामीनेच विल्यमसनची विकेट मिळवून दिली. त्यामुळेच रोहित शर्माच्या कर्णधारपदात कपिल देवची दूरदृष्टी, सौरव गांगुलीची आक्रमकता आणि महेंद्रसिंग धोनीचा संयम यांचा मेळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रोहित शर्माची फलंदाजी (विश्वचषक 2023 मध्ये)
47 धावा विरुद्ध न्यूझीलंड, 15 नोव्हेंबर, मुंबई
61 धावा विरुद्ध नेदरलँड, 12 नोव्हेंबर, बेंगळुरू
40 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता
4 धावा विरुद्ध श्रीलंका, 2 नोव्हेंबर, मुंबई
87 धावा विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ
46 धावा विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला
48 धावा विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे
86 धावा विरुद्ध पाकिस्तान, 14 ऑक्टोबर, अहमदाबाद
131 धावा विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली
0 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारताचा विश्वचषकातील अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास:
पहिला सामना: चेन्नईमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला
दुसरा सामना: दिल्लीत भारताने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला
तिसरा सामना: हमदाबादमध्ये भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला
चौथा सामना: पुण्यात भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला
पाचवा सामना: धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला
सहावा सामना: लखनौमध्ये भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला
सातवा सामना: मुंबईत भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला
आठवा सामना: भारताने कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला
नववा सामना: भारताने बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला
उपांत्य फेरी: मुंबईत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.