रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; विराट कोहलीचे शतक अन् विक्रमही हुकला

रोमहर्षक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय; विराट कोहलीचे शतक अन् विक्रमही हुकला

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली. न्यूजीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विकेट पडत गेल्या. त्यामुळे लक्ष्याकडील वाटचाल मंदावली होती. मात्र, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या महत्वाच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने विजय साकार केला. विश्वचषकात दोन दशकांनंतर भारताला न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळाले. तर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकविले आहे. तर मागील सामन्यात विराट कोहलीने 48 वे शतक झळकविले आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली हा 95 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे सचिनच्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमाला गवसणी तो घालू शकला नाही.

या स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग पाचवा विजय आहे. तर आतापर्यंत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडच्या खात्यात पहिल्या पराभवाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 273 धावा केल्या. संघाच्या डावात डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 130 धावांची खेळी करत संघाला मोठा आधार दिला. एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला धावगती त्याने कायम राखली. 130 धावांवर असताना शमीच्या एका चेंडूवर विराटच्या हाती झेल देत मिचेल बाद झाला. सलामीचे फलंदाज अपयशी रहिले. डेवॉन कॉनव्हे तर शून्यावरच बाद झाला. त्याला सिराजने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केला. यानंतर विल यंगही (17) फार काही करू शकला नाही. शमीच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला.

World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड आता ‘डेंजर झोन’मध्ये; वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचे संकट

त्यानंतर आलेल्या रचिन रवींद्र (75) आणि डॅरेल मिचेल (130) यांनी मोठी भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभी करता आली. शमीनेच ही जोडी फोडली. 178 धावा झालेल्या असताना रवींद्र बाद झाला. त्यानंतर टॉम लॅथम (5), ग्लेन फिलीप्स (23), मार्क चॅपमन (6), मिचेल सँटनर (1), मॅट हेनरी (0), लॉकी फर्ग्युसन (1) आणि ट्रेंट बोल्ट (0) यांना विशेष काही करता आले नाही. नियमित अंतराने विकेट पडत गेल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 273 धावांचे लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवले.

शमीचे जोरदार कमबॅक

भारताकडून शमीने घातक गोलंदाजी केली. त्याने पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवे दोन विकेट घेतल्या. शमीचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला विश्रांती देण्यात आली. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्यच ठरला. शमीने मिळालेल्या संधीचे सोनेच केले. 40 षटकांनंतर किवी संघाची धावसंख्या 219 धावा होती. त्यानंतर धावसंख्या 300 च्या पुढे जाईल असे वाटत होते परंतु, अखेरच्या षटकांमध्ये शमीने सातत्याने विकेट घेत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. डॅरिल मिशेलने 127 चेंडूत 130 धावा केल्या. याशिवाय रचिन रवींद्रने 75 धावा केल्या. भारताकडून शमीने सर्वाधिक 5 बळी घेतले. त्याने 10 ओव्हर्समध्ये 54 धावा दिल्या. याशिवाय कुलदीप यादवला दोन विकेट मिळाल्या. जसप्रीत बुमराह आणि सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सुरुवात चांगली पण, नंतर डाव गडगडला

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. संघाच्या 71 धावा झालेल्या असताना रोहित शर्माच्या रुपात भारताची पहिली विकेट पडली. रोहितने 46 धावा केल्या. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 76 धावा असताना लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला खरा पण अय्यर फार काळ टिकला नाही. 33 धावांवर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर आलेला केएल राहुलही (27) स्वस्तात परतला. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमारही यादवही (2) अपयशी ठरला. संघाच्या 191 धावा झालेल्या असताना पाच विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारत सामना जिंकणार की नाही अशी शंका निर्माण झाली. एकामागोमाग एक विकेट पडल्याने संघही दडपणात आला.

Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी

विराट-जडेजाची कमाल

या पडझडीतही एका बाजूला विराट कोहलीने डाव सावरला. यानंतर त्याच्या जोडीला रवींद्र जडेजा आला. या जोडीने मात्र दमदार 78 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. संघाला जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची गरज असताना विराट कोहली (95) बाद झाला. तर दुसरीकडे रवींद्र जडेजा (39) विजयी चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube