‘लगान’ ला 25 वर्षे: आमिर खान प्रॉडक्शन्सच्या आयकॉनिक चित्रपटाला मोठा सन्मान
Aamir Khan Productions : आमिर खान प्रॉडक्शन्सने चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाची सुरुवात
Aamir Khan Productions : आमिर खान प्रॉडक्शन्सने चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाची सुरुवात २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटातून झाली होती. या बॅनरने नेहमीच आशयघन कथा आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या अविस्मरणीय चित्रपटांना प्राधान्य दिले असून, भारतीय सिनेमात एक वेगळी आणि भक्कम परंपरा निर्माण केली आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ने नुकतीच आपल्या प्रदर्शित होण्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘लगान’ हा केवळ ब्लॉकबस्टर चित्रपट नव्हता, तर आपल्या प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि देशभक्ती तसेच एकजुटीच्या प्रेरणादायी भावनेमुळे तो भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
या ऐतिहासिक यशाचा उत्सव अजूनही सुरू असतानाच आमिर खान प्रॉडक्शन्सला आणखी एक प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. ‘लगान’च्या २५ वर्षपूर्तीनिमित्त इंडिया पोस्ट (भारतीय टपाल विभाग)ने चित्रपटाच्या सन्मानार्थ विशेष स्मरणिका कव्हर (Special Commemorative Cover) आणि स्पेशल कॅन्सलेशन जारी केले आहे. भारतीय सिनेमावर ‘लगान’ने उमटवलेल्या अमिट ठशाला आणि त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाला दिलेली ही एक अनोखी मानवंदना आहे.
‘लगान’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शन झाले असून, समीक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. तसेच, ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ या श्रेणीतील ऑस्कर नामांकन मिळवणारा तो तिसरा आणि आजपर्यंतचा शेवटचा भारतीय चित्रपट ठरला. भारतातही या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. ४९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनप्रधान चित्रपट’ (Best Popular Film Providing Wholesome Entertainment) यासह एकूण आठ पुरस्कार पटकावत ‘लगान’ने भारतीय सिनेमातील मैलाचा दगड म्हणून आपले स्थान कायम केले.
केतन अग्रवाल प्रकरणानंतर लोहगड देशभरात चर्चेत; ‘तो’ स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
या चित्रपटात आमिर खान, ग्रेसी सिंह, रेचल शेली, पॉल ब्लॅकथॉर्न, सुहासिनी मुले, कुलभूषण खरबंदा, राजेंद्र गुप्ता, रघुवीर यादव, आदित्य लाखिया, यशपाल शर्मा आणि अमीन हाजी यांसारख्या अनेक उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी होती. याशिवाय, ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील ‘घनन घनन’, ‘मितवा’, ‘राधा कैसे ना जले’ आणि ‘ओ रे छोरी’ ही सदाबहार गीते आजही रसिकांच्या मनात तितकीच अजरामर आहेत.