मराठी इंडी म्युझिकला नवा मानाचा मुजरा; गुरुवारी रंगणार ‘मिमा २०२६’चा सोहळा

MiMA-महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित.

  • Written By: Published:
Mima

मुंबई: मराठी संगीतविश्वात गेल्या काही वर्षांत एक मोठा बदल घडताना दिसतोय. चित्रपटांच्या चौकटीबाहेर पडत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इंडी कलाकारांची एक नवी लाट तयार झाली आहे. स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या गुंतवणुकीतून आणि कोणत्याही मोठ्या बॅनरशिवाय दर्जेदार संगीत तयार करणाऱ्या या कलाकारांनी मराठी संगीताला एक नवा आयाम दिला आहे. या नव्या प्रवाहाला योग्य व्यासपीठ, ओळख आणि सन्मान मिळावा, या हेतूने ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा)'(MiMA) ही संकल्पना आकाराला आली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’चा भव्य सोहळा २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मराठी इंडी म्युझिकच्या या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती लाभणार असून, संगीत,सृजनशीलता आणि नव्या उर्जेचा संगम असलेला ‘मिमा २०२६’ हा सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ऑडिटोरियम येथे सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. मराठी इंडी संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर, कलाकार आणि रसिक यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळणार आहे.

आजच्या डिजिटल युगात चित्रपटांपेक्षा चित्रपटाबाहेरील गाणी अधिक प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. मराठीसह खानदेशी, आगरी-कोळी, कोकणी, मालवणी अशा विविध उपभाषांमध्येही मोठ्या प्रमाणात दर्जेदार संगीतनिर्मिती होत आहे. मात्र इतकी वर्षं या कलाकारांना योग्य व्यासपीठ आणि ओळख मिळण्यात मर्यादा होत्या. ‘मिमा’मुळे आता या इंडी कलाकारांना मुख्य प्रवाहातील संगीतविश्वाशी जोडण्याची संधी मिळत आहे.

या उपक्रमाबाबत आयोजक अजय नाईक म्हणतात, ”चित्रपटसंगीताबरोबरच इंडी म्युझिकमध्येही अफाट टॅलेंट आहे, पण त्याला व्यासपीठ नव्हतं. मराठीच्या विविध उपभाषांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना सन्मान मिळावा, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं आणि मुख्य इंडस्ट्रीसोबत त्यांचा संवाद वाढावा, या उद्देशाने ‘मिमा’ची सुरुवात केली. हा उपक्रम म्हणजे इंडी संगीताला मिळालेली खरी ओळख आहे. ‘मिमा’ हा एक नॉन-प्रॉफिट उपक्रम असून यामध्ये कलाकारांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जातो. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर गाण्यांच्या नोंदी झाल्या होत्या, तर यंदाही हजारांहून अधिक गाण्यांमधून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली आहे.”

या पुरस्कार सोहळ्यात मराठी भावगीत-पॉप, भक्तिगीत, लोकगीत अशा विविध संगीत प्रकारांसह खानदेशी, आगरी-कोळी यांसारख्या उपभाषिक विभागांमध्ये पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. गायक, गायिका, संगीतकार, गीतकार यांसोबतच संगीत संयोजन आणि ध्वनीमिश्रण यांसारख्या तांत्रिक क्षेत्रातील कलाकारांनाही सन्मानित करण्यात येणार आहे, हे या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य आहे.

follow us