‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ – स्त्री मनातील भावनांचा कोलाज

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review: अगं बाई अरेच्चा! ते बाईपण भारी देवापर्यंत केदार शिंदेच्या सिनेमाची भाषेचा केंद्रबिंदू विनोद आणि संवेदनशीलता राहिला आहे.

  • Written By: Published:
Aga Aga Sunbai Kay Mhanata Sasubai

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review : अगं बाई अरेच्चा! ते बाईपण भारी देवापर्यंत केदार शिंदेच्या सिनेमाची भाषेचा केंद्रबिंदू विनोद आणि संवेदनशीलता राहिला आहे. स्त्री मनाचे पदर उलगडून दाखवताना फेमिनीझमचा झेंडा हातात न घेता रंजकपद्धतीने दाखवतो. झापूक झुपुकच्या अपयशानंतर त्याने भात्यातील हुकमी अस्त्र काढले आणि यावेळी त्याच्याकडे निर्मिती सावंत सारखा हुकुमी एक्का त्याच्याकडे होता…‘केदारच्या नाटक टेलिव्हिजन प्रवासातून‘बाईपण’ ही केवळ स्त्रीची ओळख नाही; ती अनुभवातून आलेली समज आहे, सहनशीलतेतून जन्मलेली ताकद आहे आणि आस्थेतून उमललेल्या भावनेचा कोलाज आहे आणि ही गोष्ट कायम वर्क होते, असे समीकरण आहे. याच ‘बाईपणाच्या’ भावस्पर्शी आरसा म्हणजे ‘अगं अगं सूनबाई ! काय म्हणताय सासूबाई ?’


सासू-सून… पण ‘भांडणांपलीकडची’ गोष्ट…

सासू-सुनेच्या नात्यावर मराठी सिनेमानं अनेकदा ठराविक चौकट वापरली. थोडे टोमणे, थोडे आरोप, घरात गोंधळ, आणि शेवटी विनोदाचा ‘फोडणी’सारखा तडका, पण केदार शिंदे इथे त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स मांडताना नाट्यमयतेची फोडणी देतो. हा सिनेमा सासू-सुनेच्या नात्याकडे आरडाओरडीच्या नजरेनं नाही, तर मनाच्या पातळीवरचा संघर्ष या चष्म्यातून बघायला लावतो. हा संघर्ष तो वरवरचा वाटत नाही, ही खासियत आहे. तो आतमध्ये, मनाच्या कोपऱ्यात रुतलेला आहे… म्हणूनच हा चित्रपट सतत एकच प्रश्न विचारतो.


“आपण एकमेकांना खरंच ऐकतो का?”

कथा : चौकोनी घर… आणि दोन स्त्रियांचं ‘विश्व’…स्मिता देसाई (सासू – निर्मिती सावंत), अरुण देसाई (राजन भिसे), मनस्वी (सून – प्रार्थना बेहेरे) आणि सौरभ (नकुल घाणेकर) – हे एक चौकोनी कुटुंब. घरगुती वातावरण, रोजची कुरबूर, मधल्या पुरुषाची ओढाताण… हे सगळं परिचित वाटतं. मनस्वी-सौरभ उंबरठा ओलांडण्याचा निर्णय घेतात आणि गोष्ट ठरलेली चौकट ओलांडून पलीकडे जाते. रूटीन फॉर्म्युला असला तरी पटकथा एक अनपेक्षित वळण घेते…

हा सिनेमा मग हळूहळू कलाटणी घेताना मूळ विषयापासून फारकत घेत नाही ही त्याच्या जमेची बाजू आणि दोन स्त्रियांच्या मनात चाललेल्या अदृश्य युद्धात उतरतो….स्मिता आणि मनस्वी… या सासू-सून नाहीत फक्त. त्या दोन वेगळ्या काळाच्या, वेगळ्या संस्कारांच्या आणि वेगळ्या ठेच लागलेल्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत . इथे ‘कोण चूक?’ महत्त्वाचं नाही… ‘मनात काय.. ’ ते महत्त्वाचं…या सिनेमाचं सर्वात मोठं यश म्हणजे, तो ‘न्याय निवाडा करत नाही’ देत नाही. इथे कुणी पूर्णतः बरोबर नाही, आणि कुणी पूर्णतः चूकही नाही. दोघींनाही दुःख आहे. दोघींनाही असुरक्षितता आहे. दोघींनाही “आपलं कोणी तरी समजून घ्यावं” ही भूक आहे.‘तुझं माझं जमेना’ पासून सुरू झालेली कथा ‘तुझ्या वाचून करमेना’ या टोकापर्यंत नेऊन सोडते. नाट्यमय प्रवास असला तरी नाटकी नाही, कारण भावना इथे ‘फिल्मी’ नाहीत… त्या खरी वाटतात… ही त्याची गंमत आहे.

इथे शब्दांपेक्षा मौन अधिक बोलते…
वैशाली नाईक आणि ओमकार दत्त यांचं संवादलेखन हे या सिनेमाचं प्रमुख बलस्थान. संवाद भडक नाहीत; ते संयत, मोजके अन् भिडणारे आहेत.कधी एखादा संवाद जखमेवर फुंकर घालते, तर कधी मौनच भावना अधोरेखित करते. स्त्रीमनातल्या असंख्य भावना— राग, प्रेम, असुरक्षितता, अपेक्षा, शंका— या इथे नुसत्या बोलण्यातून नाही, तर नजरेतून, देहबोलीतून आणि रोखून धरलेल्या श्वासातून व्यक्त होतात…

पटकथेतल्या छोट्या गोष्टी देतात मोठा अर्थ …
या चित्रपटात अनेक गोष्टी ‘सांगितल्या’ जात नाहीत… दाखवल्या जातात.
साडीच्या निऱ्या, घरातले कोपरे, भिंतीवरचा फॅमिली फोटो… चावी ठेवण्याची जागा… या वस्तू केवळ ‘सेट डेकोरेशन’ म्हणून नाहीत; त्या कथेत पात्र बनून येतात आणि कथानकाला वेगळा अर्थ देतात… यामध्ये पावसाचे रूपक फार प्रभावीपणे वापरलेलं आहे … त्यामुळे क्लायमॅक्सला भिजण्याला एक वेगळा अर्थ आपसूक प्राप्त होतो. मात्र काही ठिकाणी प्रसंगांची पुनरावृत्ती जाणवते आणि काही क्षण अनावश्यक लांबतात. त्यामुळे मध्येमध्ये सिनेमाची गती थोडी मंदावते. पण हा दोष फार मोठा ठरत नाही.

अभिनय : निर्मिती सावंत – प्रर्थना बेहेरेचा अभिनयाचा ‘डायलॉग’
या चित्रपटाचा भार दोन खांद्यांवर आहे—निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे.

निर्मिती सावंत यांनी साकारलेली स्मिता

कडक शिस्तीची वाटते, पण आतून हळवी. त्यांच्या अभिनयात कोणतीही भडक ‘ड्रामा’ नाही; जाणीवपूर्वक संयम आहे. निर्मिती सावंत यांनी निवडक आणि मोजक्या सिनेमात आजपर्यंत काम केले आहे, पण गेल्या काही महिन्यात त्यांच्या मोजक्या पण महत्त्वाच्या सिनेमात सातत्याने सातत्याने काम करताना दिसत आहेत.

इथे साकारलेली सासू जवळची वाटली तरी नेहमीच्या ड्राम्यामधली वाटणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. अभिनयाचा हुकमी असतं आपल्याकडे आहे आणि ते प्रभावीपणे वापरता येत असलं तरीही समज असलेली अभिनेत्री आपल्या शुभेच्छा अभिनेत्यांना अभियान काय पद्धतीने करते त्यावर तिची गुणवत्ता समज आणि प्रतिभा या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय आपल्याला निर्मिती सावंत इथे देतात. राजन भिसेचे सीन असो किंवा प्रार्थना बरोबरची जुगलबंदी येथे वरचढ वाटण्यापेक्षा समोरच्याचा सूर पकडून आपलं वेगळेपण सिद्ध करत असताना फार तफावत जाणवणार नाही आणि सीनच्या पोताला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली आहे आणि तेच अनुभवी कलावंताची समज आपल्याला दिसते.

आजच्या काळातली स्त्री. ती बंडखोर नाही, पण ती दबलेलीही नाही.“मी ऐकते… पण मी गप्प बसणार नाही” ही तिची मेंटास्टेट आहे.
या दोघींमधील केमिस्ट्री इतकी नैसर्गिक आहे की अनेकदा प्रेक्षक नकळत अंतर्मुख होतात. टिकलीचा बंद खोलीतला प्रसंग, आणि बंद गाडीतील किंकाळीचा क्षण हे दृश्य अभिनयाच्या पातळीवर उभे राहतात. आजपर्यंत पाहिलेली प्रार्थना आणि या सिनेमातील प्रार्थना यामध्ये निश्चितच फरक आहे. भूमिकेला शरण जाताना तिने स्वतःवर घेतलेली मेहनत पदोपदी जाणवते. निर्मिती सावंत समोर उभे राहत असताना त्या जोमात्या ताकदीने उभे राहण्यासाठी स्वतः मधल्या बदलाचे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन करावे लागतील, ते तिने केले आहेत. हा बदल करताना तिने कष्ट घेतले आहेत, याची जाणीव निश्चित होते.राजन भिसे आणि नकुल घाणेकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

संगीत :नॉस्टॅल्जियाचे नवीन डायमेन्शन…

संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे. जुन्या nostalgic करणाऱ्या गाणी इथे प्रसंगांना वेगळी उंची देतात. हा फॉर्म्युला केदारने फार खुबीने वापरला आहे.विशेषतः ‘डाव मोडू नको’ हे गाणं घरातील तणाव आणि संवाद तुटल्याने वाढणारी दरी अतिशय प्रभावीपणे व्यक्त करतं. वैशाली सामंत यांचा आवाज आणि कुणाल करण यांचं संगीत मूळ गाण्याचा आत्मा जपत आधुनिक स्पर्श देतं.‘दिवस तुझे हे फुलायचे’ हे गाणं आईपणाच्या हळव्या प्रवासाला कवटाळून ठेवतं. आणखी दोन सरप्राइज या सिनेमात गाण्याच्या रूपात आहे.

तांत्रिक बाजू : चमकधमक नाही…म्हणूनच अस्सल…

मयूर हरदास यांचं छायांकन आणि संकलन कथेला नैसर्गिक ठेवतं. कुठेही अनावश्यक झगमग नाही. त्यामुळे कथा बनावटी वाटत नाही; ती प्रेक्षकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो.

हा सिनेमा ‘फक्त महिलांसाठी’ नाही…

हा सिनेमा महिलांसाठी आहे असं समजणं, हा पुरुष प्रेक्षकांनी स्वतःवर अन्याय करून घेणं आहे. उलट, आपल्या आयुष्यातील स्त्रियांना समजून घेण्यासाठी हा चित्रपट एक आरसा ठरू शकतो. घरातील दोन स्त्रियांमधील नातं केवळ संघर्षांचं नसतं; त्यात समज, आधार, आणि मैत्रीही असू शकते. हे दाखवणारा हा सिनेमा नात्यांकडे नव्या नजरेनं पाहण्याची संधी देतो. हा सिनेमा भावनिक आहे, पण कृत्रिम… बेगडी नाही. तो स्त्रीप्रधान असला तरीही पुरुषविरोधी नाही.
सासू-सून या नात्याचा पारंपरिक आरसा बाजूला ठेवून हा सिनेमा माणूसपणाचा आरसा समोर आणतो— आणि शेवटी प्रेक्षकाच्या मनात प्रश्न उपस्थित करतो …
“आपण आपल्या घरातल्या माणसांना खरंच ‘ऐकतो’ का?… त्यांना निरखून पाहतो का… समजून घेण्यात कमी पडतो का ?

अमित भंडारी, डिजिटल सीईओ, सोहम ग्रुप

—————
का बघावा ? स्त्री मनाच्या भावनांचा कोलाज आहे.
का टाळावा ? प्रसंगांची पुनरावृत्ती, अनावश्यक लांबलेले काही सीन्स ..
थोडक्यात काय ? सासू सुनेच्या नात्यापलीकडचं माणूसपणाचा सिनेमा

सिनेमा : ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’
निर्मिती : झी स्टुडिओज, सनफ्लॉवर स्टुडिओज
दिग्दर्शन : केदार शिंदे
कथा-पटकथा : वैशाली नाईक, ओमकार दत्त
कलाकार : निर्मिती सावंत, प्रार्थना बेहेरे, राजन भिसे, नकुल घाणेकर
छायांकन-संकलन : मयूर हरदास
दर्जा : ⭐⭐⭐½ (साडे तीन स्टार)

follow us