अमिताभ बच्चन नावाचं वादळ : नकार ते महानायक…

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये जन्मलेले अमिताभ आज वयाची 84 वर्षं पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

  • Amit Bhandari
  • Written By: Published:
Amitabh Bachchan Birthday

Amitabh Bachchan’s birthday : काही माणसं पडद्यावर मोठी होतात; काही पडद्याबाहेरही मोठी असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करणाऱ्या मोजक्या माणसांपैकी एक. त्यांच्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्या अभिनयाने पिढ्या घडवल्या आणि त्यांच्या संघर्षाने यशाची नवी व्याख्या लिहिली. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक माणूस आहे, जो आजही आपल्या आईच्या आवाजाने भावुक होतो ! काळाचा एक मोठा विनोद असतो. तो कधी कधी एखाद्याच्या आयुष्याची सुरुवातच अशा नकाराने करतो, की पुढे त्याच नकाराची गोष्ट प्रेरणादायी आख्यायिका बनते.

अमिताभ बच्चन यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. एकेकाळी ऑल इंडिया रेडिओमध्ये निवेदक होण्याची इच्छा घेऊन गेलेल्या अमिताभ यांच्या आवाजाला नकार मिळाल्याची आठवण सांगितली जाते. आवाज खर्जातला, भारदस्त आणि वेगळा होता. बहुधा त्या काळच्या रेडिओला तो आवाज झेपला नसावा. पण नियतीच्या कास्टिंग डायरेक्टरने मात्र हा आवाज जपून ठेवला होता! पुढे याच आवाजाने चित्रपटगृहांवर राज्य केलं, जाहिरातींना ओळख दिली, कवितांना नवी उंची दिली आणि ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून कोट्यवधी घरांचा उंबरठा ओलांडला. रेडिओने नाकारलेला आवाज पुढे संपूर्ण देशाच्या गळ्यातला ताईत बनला. नियतीला कधी कधी विनोद करण्याची विलक्षण सवय असते. फरक इतकाच, की तिच्या विनोदावर हसण्यासाठी काही दशकं थांबावं लागतं!

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबादमध्ये जन्मलेले अमिताभ आज वयाची 84 वर्षं पूर्ण करून 85व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयातही त्यांच्या नावाभोवती असलेलं वलय कमी झालेलं नाही. उलट, काळ पुढे जातोय आणि अमिताभ बच्चन नावाच्या व्यक्तिमत्त्वाची उंची अधिकाधिक जाणवते आहे. आपण त्यांना प्रेमाने ‘बिग बी’ म्हणतो. कुणासाठी ते ‘अँग्री यंग मॅन’ आहेत, कुणासाठी ‘शहेनशाह’, तर कुणासाठी ‘सदी के महानायक’. पण या बिरुदांच्या पलीकडे असलेल्या माणसाचा वेध घ्यायचा, तर त्याच्या आयुष्यातल्या काही पानांवर पुन्हा नजर टाकावी लागेल.

नकारातून उभा राहिलेला महानायक

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला साहित्याचा सुगंध होता. वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यविश्वातील नामवंत कवी. शब्द, कविता आणि विचार यांचा वारसा घरात होता; पण मुलाच्या नशिबात चित्रपटसृष्टीचा संघर्ष लिहिला होता. उंची खूप आहे, चेहरा पारंपरिक नायकासारखा नाही, आवाज खूप गंभीर आहे…अशा अनेक शंकांना सामोरं जात त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’मधून त्यांचा प्रवास सुरू झाला. मात्र सुरुवातीचे चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. ‘आनंद’मध्ये राजेश खन्ना यांच्यासारख्या लोकप्रिय नायकासोबत काम करतानाही अमिताभ यांनी आपल्या भूमिकेचा वेगळा ठसा उमटवला. चित्रपटात त्यांच्याकडे फार मोठा अवकाश नव्हता; पण त्या मर्यादित अवकाशातही त्यांनी स्वतःची उपस्थिती जाणवून दिली. मग 1973 मध्ये ‘जंजीर’ आला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा नायक मिळाला. तो नेहमीच्या अर्थाने प्रेमगीतं गाणारा, नायिकेच्या मागे फिरणारा, फुलांच्या बागेत नाचणारा नायक नव्हता. त्याच्या मनात राग होता, डोळ्यांत वेदना होती आणि व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची ताकद होती. तो नायक समाजाच्या अस्वस्थतेचा आवाज बनला. ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘डॉन’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांनी त्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केलं.

अमिताभ यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी रागालाही अभिनयाची भाषा दिली. त्यांची शांतताही बोलायची आणि त्यांचा आवाजही. कधी कधी तर त्यांनी काही न बोलणंच अधिक परिणामकारक ठरवलं. पडद्यावरचा हा माणूस संवाद म्हणत नव्हता; तो संवाद जगत होता आणि एकदा का हा आवाज लोकांच्या मनात उतरला, की त्याला नकार देणाऱ्या जगाला स्वतःच्याच निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला!

जय-वीरू : मैत्रीची अनोखी गाथा…
अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वातला गंभीरपणा आपण नेहमी पाहतो. पण त्यांच्यातला मिश्कील, खेळकर माणूसही तितकाच रंजक आहे. त्याची आठवण झाली की ‘चुपके चुपके’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘नमक हलाल’ हे चित्रपट आठवतात. मात्र मैत्रीचा विषय निघाला, की ‘शोले’मधल्या जय-वीरूला विसरणं अशक्य! जय अबोल. वीरू बडबड्या. जय मितभाषी, वीरू दिलखुलास. एकाच्या चेहऱ्यावर शांततेची चादर, तर दुसऱ्याच्या तोंडावर संवादांचा पाऊस. पण दोघांची मैत्री अशी, की एकाने जीव धोक्यात घातला तर दुसऱ्याने मागे वळून विचारायचंही नाही! वीरूला बसंतीवर प्रेम जडलं की त्याच्या भावना टाकीवर चढून व्यक्त व्हायच्या. जयच्या मनात राधासाठी प्रेम होतं; पण त्याच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. वीरू प्रेमात पडला की गावाला कळायचं; जय प्रेमात पडला की प्रेक्षकांच्या लक्षात यायचं! चित्रपटातली ही गंमत केवळ संवादांमुळे जिवंत झाली नाही. धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीने तिला एक वेगळंच आयुष्य दिलं. दोघांचे स्वभाव, देहबोली आणि विनोदाची शैली भिन्न होती; पण पडद्यावर त्यांची मैत्री अगदी सहज वाटायची.

‘शोले’ पाहताना आपण अनेकदा गब्बरला विसरत नाही, ठाकूरचा सूड विसरत नाही, बसंतीचा टांगाही विसरत नाही; पण जय-वीरूची मैत्री मनात कायम राहते. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा मित्र असतो, ज्याच्याशी फारसं बोलावं लागत नाही. तो जवळ असला की पुरेसं वाटतं. जयच्या व्यक्तिमत्त्वात अमिताभ यांच्या अभिनयाची आणखी एक बाजू दिसली…कमी बोलून अधिक सांगण्याची. संवादांवर राज्य करणाऱ्या कलाकाराला शांततेतूनही प्रेक्षकांशी संवाद साधता येतो, हे त्यांनी दाखवलं. आणि जय-वीरूची गंमत अशी, की चित्रपट संपला, पडदा पडला, प्रेक्षक घरी गेले; तरी त्या मैत्रीचा मुक्काम त्यांच्या मनात कायम राहिला. काही चित्रपट हिट होतात. काही चित्रपट इतिहास बनतात. आणि काही चित्रपट आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायमची जागा मिळवतात. ‘शोले’ या तिसऱ्या प्रकारातला!


‘कुली’चा अपघात : पडद्यावरच्या नायकाची खरी कसोटी

1982 मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली. पुनीत इस्सर यांच्यासोबतच्या लढाईच्या प्रसंगात झालेल्या अपघातानंतर त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. पडद्यावर शेकडो संकटांवर मात करणाऱ्या नायकाच्या आयुष्यातलं हे संकट मात्र खऱ्या अर्थाने भयावह होतं. देशभरातील चाहते त्यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांची वाट पाहत होते. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना होत होत्या. चित्रपटात नायक जखमी झाला की पार्श्वसंगीत सुरू होतं, डॉक्टर धावत येतात आणि शेवटी नायक डोळे उघडतो. प्रत्यक्ष आयुष्याला मात्र पार्श्वसंगीत नसतं. तिथे अनिश्चितता असते, वेदना असतात आणि जगण्याची इच्छा असते. अमिताभ त्या संकटातून परतले.या घटनेने त्यांच्या चाहत्यांचं प्रेम अधिक गहिरं केलं. मात्र या अपघाताची आठवण करताना पुनीत इस्सर यांनाही लोकांच्या तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला, ही बाब विसरता कामा नये. पडद्यावरच्या लढाईत पात्रं एकमेकांवर तुटून पडतात; पण पडद्याबाहेर ते सहकारी असतात, माणसं असतात. या प्रसंगाने एक गोष्ट अधोरेखित केली…महानायक पडद्यावर असतो, पण त्याच्या वेदना, त्याच्या भीती आणि त्याचं जगणं अगदी सामान्य माणसासारखंच असतं.

महानायकाच्या आयुष्यातलं सर्वांत मोठं संकट !

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द म्हणजे यशाची अखंड चढण नव्हे. त्यांच्या आयुष्यात अपयशही आलं, आरोग्याच्या समस्या आल्या आणि आर्थिक संकटानेही त्यांना घेरलं. 1990 च्या दशकात त्यांनी स्थापन केलेल्या ABCL या कंपनीला मोठं आर्थिक नुकसान झालं. कर्जाचा डोंगर उभा राहिला. चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर यशाची अनेक शिखरं होती, त्याच माणसाला पुन्हा कामासाठी संघर्ष करावा लागला. यशाच्या शिखरावर असताना जग तुमचं स्वागत करतं. पण संकट आलं की अनेक दरवाजे बंद होतात. कालपर्यंत ज्याच्या एका हाकेला गर्दी जमायची, त्याला आज स्वतःहून दार ठोठावावं लागतं. आयुष्याची खरी परीक्षा इथेच असते. अमिताभ यांच्यासमोरही हाच प्रश्न होता…जुन्या यशाच्या आठवणींमध्ये रमायचं, की पुन्हा नव्याने सुरुवात करायची? त्यांनी दुसरा मार्ग निवडला.

2000 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून त्यांनी दूरचित्रवाणीवर सूत्रसंचालक म्हणून पदार्पण केलं. मोठा चित्रपटतारा छोट्या पडद्यावरह येतोय, याकडे सुरुवातीला काही जणांनी साशंकतेने पाहिलं. पण अमिताभ यांनी या माध्यमाला केवळ कामाची संधी म्हणून स्वीकारलं नाही; त्यांनी त्यातून प्रेक्षकांशी नवं नातं निर्माण केलं. ‘देवियों और सज्जनों’ या शब्दांनी सुरू होणारा त्यांचा संवाद लाखो घरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला. या कार्यक्रमाने त्यांना नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्या आर्थिक पुनरागमनातही महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याच्या कारकिर्दीला संपल्याची भविष्यवाणी काही जण करत होते, तो पुन्हा लोकांच्या घराघरांत पोहोचला. यातली खरी गंमत अशी, की ज्या माध्यमाला एकेकाळी त्यांच्या आवाजाने नाकारलं होतं, त्याच आवाजाने आता दूरचित्रवाणीच्या मंचावर कोट्यवधी लोकांना खिळवून ठेवलं आणि KBC मध्ये अमिताभ यांचं मोठेपण केवळ प्रश्न विचारण्यात नव्हतं. समोरच्या सामान्य माणसाला आदर देण्यात होतं. एखादा स्पर्धक चुकीचं उत्तर देतो, एखादी व्यक्ती आपल्या संघर्षाची कहाणी सांगते, एखाद्याला आयुष्यात पहिल्यांदा मोठी रक्कम जिंकण्याची संधी मिळते…अशा वेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला माणुसकीची ऊब देतात. मोठा स्टार असणं एक गोष्ट. पण आपल्या समोर बसलेल्या सामान्य माणसाला महत्त्वाचं वाटायला लावणं ही त्याहून मोठी गोष्ट. अमिताभ यांनी हे साध्य केलं. आर्थिक संकटानंतरचं त्यांचं पुनरागमन हा त्यांच्या आयुष्यातला केवळ व्यावसायिक विजय नव्हता. तो स्वतःच्या अपयशाला सामोरं जाण्याचा आणि त्यातून पुन्हा उभं राहण्याचा विजय होता.

‘मोहब्बतें’मधून चित्रपटसृष्टीत नव्या भूमिकेत परतणं, ‘ब्लॅक’, ‘पा’ आणि ‘पीकू’सारख्या चित्रपटांतून स्वतःला नव्याने सिद्ध करणं…हा त्याच प्रवासाचा पुढचा भाग होता. काळ बदलला, नायकाच्या व्याख्या बदलल्या, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या. पण अमिताभ यांनी बदल स्वीकारला. ते जुन्या यशाच्या चौकटीत स्वतःला बंद करून बसले नाहीत. अपयशानंतर पुन्हा उभं राहणं, स्वतःला बदलण्याची तयारी ठेवणं आणि कामाप्रतीची भूक जिवंत ठेवणं…यालाच कदाचित मोठेपण म्हणतात.

वडिलांची कविता, मुलाचा आवाज आणि ‘अग्निपथ’
हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा असणं ही अमिताभ यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. वडिलांशी त्यांचं नातं केवळ रक्ताचं नव्हतं; ते शब्दांचं, कवितांचं आणि विचारांचंही होतं. हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता अमिताभ यांच्या आवाजात लोकप्रिय झाली. वडिलांचे शब्द आणि मुलाचा आवाज यांचा संगम विलक्षण होता. कवितेचा आशय संकटांतून पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आयुष्य कितीही कठीण असलं, तरी चालत राहायचं. पडायचं, उठायचं आणि पुन्हा चालायचं. या कवितेकडे अमिताभ यांच्या आयुष्याच्या संदर्भात पाहिलं, की तिचा अर्थ अधिक गहिरा वाटतो. कारकिर्दीतील नकार, ‘कुली’चा अपघात, आर्थिक संकट आणि त्यानंतरचं पुनरागमन…या प्रत्येक वळणावर त्यांना पुन्हा उभं राहावं लागलं. वडिलांनी लिहिलेल्या कवितेला मुलाच्या जगण्याने एक वेगळाच संदर्भ दिला. घरात शब्दांचा वारसा होता. बाहेर आयुष्याची परीक्षा होती. आणि या दोन्हींच्या संगमावर उभा राहून अमिताभ यांनी स्वतःची वाट निर्माण केली.

आईच्या आवाजाने भावुक झालेला महानायक!
आता या सगळ्या प्रवासाकडे एकदा मागे वळून पाहा. ज्या माणसाच्या एका संवादावर चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो, ज्याच्या आवाजाने लाखो लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात, ज्याच्या चेहऱ्यावरचा राग पडद्यावरच्या व्यवस्थेला हादरवतो, जो आर्थिक संकटातून पुन्हा उभा राहतो आणि लाखो प्रेक्षकांसमोर आत्मविश्वासाने उभा राहतो—तोच माणूस आईच्या आवाजाने भावुक होतो! ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका विशेष प्रसंगात आई तेजी बच्चन यांच्या जुन्या आवाजाशी संबंधित आठवणींनी अमिताभ भावुक झाल्याचा प्रसंग समोर आला होता. अशा क्षणी त्यांच्या महानायकपदाला कुठलाही धक्का बसत नाही. उलट, त्या प्रतिमेला माणुसकीचा नवा आयाम मिळतो. कारण प्रसिद्धी कितीही मोठी असली, तरी आईच्या आठवणींपुढे माणूस पुन्हा लहान होतो. आयुष्यात कितीही उंची गाठली, तरी ज्यांनी आपल्याला पहिल्यांदा नावाने हाक मारली, त्यांचा आवाज मनात कुठेतरी कायमचा साठलेला असतो. जगासाठी तो अमिताभ बच्चन असतो. चित्रपटसृष्टीसाठी तो महानायक असतो. लाखो चाहत्यांसाठी तो त्यांच्या आठवणींचा भाग असतो. पण आईसाठी तो तिचा मुलगा असतो. आणि मुलासाठी आईचा आवाज हा जगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो.

आपण अमिताभ यांना पडद्यावर अनेकदा रडताना पाहिलं आहे. कधी भूमिकेची गरज म्हणून, कधी कथानकाच्या ओघात. पण जुन्या आठवणींनी भरून आलेले डोळे आपल्याला वेगळंच काहीतरी सांगतात. ते सांगतात की या माणसाच्या आयुष्यात यश आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे; पण त्याच्या मनात अजूनही न पुसल्या जाणाऱ्या आठवणींची एक जाता आहे. ती जागा कोणत्याही प्रकाशझोतात दिसत नाही. तिथे कॅमेरे नसतात, संवादलेखक नसतो, दिग्दर्शकाची सूचना नसते. तिथे असतो फक्त काळ, आठवणी आणि नात्यांचा हळवा स्पर्श महानायकाला जगाने कितीही उंचावर नेऊन ठेवलं, तरी त्याच्या मनातल्या या जागेची उंची वेगळीच असते.

अमिताभ बच्चन : अखेर एका माणसाची गोष्ट!
अमिताभ बच्चन यांचं व्यक्तिमत्त्व एका शब्दात मांडायचं झालं, तर ‘महानायक’ हा शब्द पुरेसा वाटतो. पण त्याच वेळी तो अपुरा असल्याचीही जाणीव होते. कारण ‘महानायक’ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर ‘दीवार’मधला विजय उभा राहतो. ‘शोले’मधला जय आठवतो. ‘डॉन’ची ऐट दिसते. ‘अमर अकबर अँथनी’चा अँथनी हसवतो. ‘ब्लॅक’मधला शिक्षक अंतर्मुख करतो. ‘पा’मधला ऑरो चकित करतो. आणि ‘कौन बनेगा करोडपती’चा सूत्रसंचालक आपल्या घरातला वाटू लागतो. ही सगळी माणसं एकाच कलाकाराने साकारली आहेत, याचं आश्चर्य वाटतं. पण त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे या सगळ्या प्रतिमांच्या पलीकडे एक माणूस आहे. ज्याला नकार मिळाले, ज्याने अपयश पाहिलं, ज्याने मृत्यूशी झुंज दिली, ज्याच्यावर आर्थिक संकट आलं आणि ज्याने पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्याच्या प्रवासात चढउतार आहेत. कारकिर्दीत यश आणि अपयश दोन्ही आहेत. पण त्याने कामाकडे परतण्याची तयारी कधी सोडली नाही.

आज त्यांच्या वाढदिवशी त्यांचे चित्रपट आठवणं स्वाभाविक आहे. त्यांचे संवाद आठवणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अभिनयाचं कौतुक करणंही स्वाभाविक आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या प्रवासातून मिळणारा धडा लक्षात ठेवणं. मोठं होणं ही एक गोष्ट आहे; पण काळ बदलला, परिस्थिती बदलली, यश हातातून निसटलं तरी पुन्हा स्वतःला उभं करणं ही खरी मोठेपणाची खूण आहे. अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात अनेकदा नायकाची भूमिका केली. पण त्यांच्या आयुष्याने त्यांना एका वेगळ्याच भूमिकेत उभं केलं…स्वतःच्या मर्यादांशी झगडणाऱ्या, अपयशातून शिकणाऱ्या आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणाऱ्या माणसाच्या भूमिकेत आणि म्हणूनच अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलताना केवळ चित्रपट आठवत नाहीत. आठवतो तो काळ, ज्यात आपण मोठे झालो. आठवतात ते संवाद, जे आपल्या आयुष्याचा भाग बनले. आठवतात त्या भूमिका, ज्यांत आपण स्वतःला कुठेतरी शोधलं. पण या सगळ्या आठवणींच्या शेवटी मनात उरतो तो एक साधा विचार. एकेकाळी ज्याच्या आवाजाला नकार मिळाला, त्याच आवाजाने जग जिंकलं. ज्याने जयसारख्या अबोल मित्राला पडद्यावर अजरामर केलं, त्याने आयुष्यातील संकटांना शांतपणे तोंड दिलं. ज्याने आर्थिक संकटानंतर पुन्हा सुरुवात केली, त्याने यशाला अंतिम मुक्काम मानलं नाही. आणि ज्याच्या आवाजात जगाला धीर देण्याची ताकद आहे, तोच माणूस आईच्या आठवणीने आजही हळवा होतो. कदाचित म्हणूनच अमिताभ बच्चन आपल्याला इतके जवळचे वाटतात.

कारण आपण त्यांच्यात केवळ एक सुपरस्टार पाहत नाही. आपण त्यांच्यात आपला काळ पाहतो, आपल्या आठवणी पाहतो, आपल्या संघर्षांची सावली पाहतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपण त्यांच्यात एक असा माणूस पाहतो, ज्याच्याकडे जगाने सर्व काही दिलं असलं, तरी काही आठवणी आजही त्याच्या डोळ्यांत पाणी आणू शकतात. स्टार अनेक येतात. लोकप्रियतेची शिखरं अनेक जण गाठतात. पण काळाच्या बदलत्या प्रवाहात स्वतःचं स्थान टिकवून ठेवणारे कलाकार फार थोडे असतात. अमिताभ बच्चन त्यांपैकी एक आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बच्चन साहेब! तुमच्या आवाजाचा दरारा असाच राहो. अभिनयाची भूक कायम राहो. नव्या पिढ्यांना तुमच्याकडून मेहनतीची, जिद्दीची आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा मिळत राहो आणि तुमच्या आयुष्यातील त्या खास आठवणीही अशाच जिवंत राहोत, ज्या तुम्हाला जगाच्या नजरेतला महानायक न ठेवता, तुमच्या आईचा मुलगा बनवतात. कारण जगासाठी तुम्ही ‘सदी के महानायक’ आहात. पण एखाद्या जुन्या आवाजात, एखाद्या हळव्या आठवणीत, एखाद्या न पुसल्या जाणाऱ्या क्षणात तुम्ही आजही तेच अमिताभ आहात…आईच्या हाकेला ओ देणारे, तिच्या आठवणीने डोळे पाणावणारे एक मुलगा. जगाने डोक्यावर लोकप्रियतेचा मुकुट चढवला असतानाही मनातल्या नात्यांपुढे नतमस्तक होता येणं… हीच महानायकपदाची खरी उंची तिथेच दडलेली आहे…
– अमित भंडारी

follow us