पेड्रो पास्कलची नवी दमदार भूमिका; टोनी गिलरॉय यांच्या ‘बेहेमोथ!’चा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित
अकादमी पुरस्कार नामांकन मिळवलेल्या टोनी गिलरॉय यांच्या बहुप्रतीक्षित ‘बेहेमोथ!’ चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘Behemoth!’ teaser and poster released : प्रसिद्ध अभिनेता पेड्रो पास्कल याला प्रेक्षकांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. मात्र आता तो एका प्रतिभावान सेलोवादकाच्या भूमिकेत दिसणार असून, अकादमी पुरस्कार नामांकन मिळवलेल्या दिग्दर्शक टोनी गिलरॉय यांच्या बहुप्रतीक्षित ‘बेहेमोथ!’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्चलाईट पिक्चर्स हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करणार आहे.
‘बेहेमोथ!’ची कथा अॅलेक्स सेरियन (पेड्रो पास्कल) या असामान्य प्रतिभा असलेल्या सेलोवादकाभोवती फिरते. तब्बल 20 वर्षे सतत प्रवास करत जगभर संगीत सादर केल्यानंतर तो आपल्या लॉस एंजेलिसमधील घरी परततो. संगीत हेच त्याच्या आयुष्याचे केंद्रबिंदू राहिलेले असते. मात्र घरी परतल्यानंतर त्याचे हेच संगीत त्याला एका अशा प्रवासावर घेऊन जाते, जो त्याचे आयुष्य कायमचे बदलून टाकतो.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन टोनी गिलरॉय यांनी केले आहे. ‘स्टार वॉर्स: अँडोर’ आणि ‘मायकल क्लेटन’ यांसारख्या गाजलेल्या प्रकल्पांमुळे गिलरॉय यांना विशेष ओळख मिळाली आहे. ‘बेहेमोथ!’ मध्ये पेड्रो पास्कलसोबत ऑलिव्हिया वाइल्ड, इव्हा व्हिक्टर, अलेक्सा स्विंटन, काया रॉल्स, एरिक ग्रिफिन, जोबेथ विल्यम्स, मार्गारिटा लेव्हिएवा, हँक अझारिया आणि विल आर्नेट यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
31 दिवस तुरुंगात राहिला म्हणून लोकप्रतिनिधी दोषी ठरत नाही; सुप्रिया सुळेंचा सुमोटो प्रस्तावाला विरोध
टीझरमध्ये अॅलेक्सच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष, संगीताशी असलेले त्याचे अतूट नाते आणि स्वतःचा शोध घेण्याचा त्याचा प्रवास यांची झलक पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट केवळ संगीतावर आधारित नसून आत्मशोध, नातेसंबंध आणि आयुष्याच्या नव्या अर्थाचा शोध घेणारी भावनिक कथा असल्याचे स्पष्ट होते. चित्रपटाची निर्मिती टोनी गिलरॉय, सॅन वोलेंबर्ग आणि जॉन गिलरॉय यांनी केली आहे. पेड्रो पास्कलच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांपैकी एक मानला जाणारा ‘बेहेमोथ!’ आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
सर्चलाईट पिक्चर्सतर्फे ‘बेहेमोथ!’ हा चित्रपट भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.